गडचिरोली : कुरखेडा तालुक्यातील खेडगाव येथे शनिवारी दुपारी सती नदीत आंघोळीसाठी गेलेल्या चार अल्पवयीन मुलांपैकी तिघांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. तर चौथ्या मुलाने प्रसंगावधान राखत गावकऱ्यांना माहिती दिल्याने त्याचा जीव वाचला. या हृदयद्रावक घटनेनंतर जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी नागरिकांना पावसाळ्यात नदी-नाले आणि इतर जलस्रोतांपासून सुरक्षित अंतर राखण्याचे आवाहन केले आहे.

प्राथमिक माहितीनुसार, शनिवारी दुपारी सुमारे १२.३० वाजताच्या सुमारास चार मुले सती नदीत आंघोळीसाठी गेली होती. त्यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने तिघे पाण्यात बुडाले. या दुर्घटनेत लक्ष्मण सुन्हेर दुधकवर (वय ६), कुनाल नरेश दुधकवर (वय ५) आणि कोहित युवराज सराटे (वय ११) यांचा मृत्यू झाला. चौथ्या मुलाने तातडीने गावातील नागरिक आणि मच्छीमारांना माहिती दिल्यानंतर बचावकार्य सुरू करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच महसूल, पोलीस व स्थानिक प्रशासनाच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा व इतर आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून प्राथमिक तपासात तिघांचा मृत्यू बुडाल्यामुळे झाल्याची माहिती तहसीलदारांनी दिली.

सतर्कता बाळगण्याचे आवाहन

या घटनेबद्दल दुःख व्यक्त करत जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर विशेष सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे. मुसळधार पावसामुळे नदी, नाले, ओढे, तलाव, बंधारे तसेच खाणींमधील पाणीसाठ्यांची पातळी धोकादायकरीत्या वाढली असून अशा ठिकाणी आंघोळ, पोहणे किंवा अनावश्यक वावर टाळावा, असे त्यांनी सांगितले.

सूचनांचे काटेकोर पालन करा

तसेच, पुलांवर किंवा रस्त्यांवरून पाणी वाहत असताना कोणत्याही परिस्थितीत वाहन किंवा पायी जाण्याचा प्रयत्न करू नये. पाण्याचा वेग आणि खोलीचा अंदाज येत नसल्याने जीवितहानीचा धोका वाढतो. विशेषतः पालकांनी लहान मुलांवर सतत लक्ष ठेवून त्यांना नदी-नाल्यांसह सर्व जलस्रोतांपासून दूर ठेवावे आणि प्रशासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.