नागपूर : गडचिरोली जिल्ह्यातील रस्त्यांची दैनावस्था आणि त्याच्या होणाऱ्या त्रासामुळे त्रस्त झालेल्या गडचिरोली जिल्ह्यातील एका ज्येष्ठ नागरिकाने शेवटी मुख्यमंत्र्यांनाच उपरोधिक पत्र दिले. त्यांना जेवणाचे आमंत्रण देतानाच कोणत्या मार्गाने यायचे हे देखील सांगितले. त्यामुळे हे पत्र सध्या चर्चेचा विषय ठरले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. जिल्ह्यातील सुरजागड येथे लोहखाण प्रकल्प आणि त्या प्रकल्पाकडे नेणारा मार्गही त्यांनी दुरुस्त करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, जिल्ह्यातील सामान्य नागरिक अजूनही रस्त्याअभावी खस्ता खात आहे. जिल्ह्यातील चामोर्शी येथे राहणाऱ्या अश्विनी सुरेश आचार्य या सत्तरीच्या उंबरठ्यावर असलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी त्रस्त होत थेट मुख्यमंत्र्यांनाच पत्र लिहिले.

या पत्रात त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना आपुलकीचे आमंत्रण देखील दिले आहे. या पत्रात त्या म्हणतात, ‘आपण खवय्ये आहात हे साऱ्या महाराष्ट्राला माहिती आहे. तर्री पोहे, वडापाव यावरील आपल्या अनेक मुलाखती आम्ही पाहिल्या आहेत. मी देखील विदर्भात प्रसिद्ध असलेली सांबारवडी उत्तम बनवते. आमच्या चामोर्शी परिसरातील चक्क्याच्या दह्याचे श्रीखंत तर खासच. साहेब, आपण आमच्या घरी या. माझ्या हातची सांबारवडी आणि श्रीखंड आपण जरुर चाखा. फक्त एक लहानची अट आहे.

चामोर्शीला येताना आपण गडचिरोलीकडून न येता आपल्या मूल गावाजवळच्या मूल-हरणघाट-चामोर्शी या मार्गाने या. या मार्गावर आपल्याला वैनगंगेवरचा भव्य हरणघाट पूल दिसेल. त्यानंतर लगेच दिसेल तो गेल्या दहा वर्षांपासून आज होईल, उद्या होईल अशा आशेवर जगणारा आमचा रस्ता.

असे म्हणतात की, साहेब येणार आहेत म्हटल्यावर रस्ता रातोरात गुळगुळीत होतो. आपण येणार एवढी बातमी जरी पसरली तरी कदाचित सार्वजनिक बांधकाम विभाग हा मूल-चामोर्शीचा ७६ किलोमीटरचा रस्ता थोडा तरी माणसासारखा करतील. आज चंद्रपूर-नागपूरचा १६० किलोमीटरचा प्रवास अडीच तासात होतो, पण चंद्रपूर-मूल-चामोर्शीचे अवघे ७६ किलोमीटर अंतर पार करायला तीन ते साडेतीन तास लागतात. हा प्रवासही जीव मुठीत घेऊन करावा लागतो.

गडचिरोलीचे तीन आमदार झाले. आपले सरकार तीन वेळा आले, पण या रस्त्याचे नशीब काही उजळले नाही. माझी मुलगी चंद्रपूरला असते आणि मुलगा नागपूरला. नातवंडांना भेटण्यासाठी आम्हाला प्रवास करावा लागतो, पण या रस्त्यामुळे मूल-चामोर्शी बस सायंकाळी सहानंतर मिळतच नाही.

काही दिवसांपूर्वी माझे पती सुरेश आचार्य कमरेच्या उपचारसाठी चंद्रपूरला गेले. परतताना थोडा उशीर झाला म्हणून त्यांना मूल बसस्थानकावर सायंकाळी सहा ते रात्री साडेनऊपर्यंत कडाक्याच्या थंडीत ताटकळत बसावे लागले. शेवटी एका लॉजमध्ये झोपण्याची वेळ आली. आम्ही दोघेही सत्तरीच्या जवळ आहोत, पण आता हा रस्ताच आम्हाला एखाद्या दिवशी थेट स्मशानात पोहोचवेल की काय, असे वाटते.

आमच्या घरी या. सांबारवडी व श्रीखंड मी स्वत: करील, पण या रस्त्याला आपल्या पावलांचा स्पर्शही होऊ द्या. कदाचित आपल्या येण्यामुळे तो रस्ता तयार होईल आणि आमच्यासारख्या वृद्धांना आमच्या मुले व नातवंडांना भेटता येईल.