नागपूर : घनदाट जंगल, नद्या-नाले आणि संपर्क यंत्रणेच्या अभावामुळे पावसाळ्यात वीजवाहिनीतील बिघाड शोधणेही कठीण ठरणाऱ्या सिरोंचा तालुक्याला आता तेलंगणातून पर्यायी वीजपुरवठा मिळणार आहे. किस्तमपेठ ते सिरोंचा या ३२ किलोमीटर अंतरात ११३ मनोरे उभारून १३२ केव्ही अतिउच्चदाब वीजवाहिनीचे काम सुरू आहे. ही व्यवस्था पूर्ण झाल्यानंतर तालुक्यातील १४० दुर्गम व अतिदुर्गम गावांतील सुमारे ७५ हजार नागरिकांना अधिक दर्जेदार आणि सुरळीत वीजपुरवठा मिळण्याची अपेक्षा आहे.
सिरोंचाला सध्या वीजपुरवठा कुठून होतो?
गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून सुमारे २५० किलोमीटरवर असलेल्या सिरोंचा तालुक्याला आलापल्ली येथील १३२/६६ केव्ही उपकेंद्रातून वीजपुरवठा होतो. तेथून ९३ किलोमीटर लांबीच्या ६६ केव्ही वीजवाहिनीद्वारे सिरोंचातील महापारेषणच्या ६६/३३ केव्ही उपकेंद्रापर्यंत वीज पोहोचते.
तालुक्यात किती ग्राहक आहेत?
सिरोंचा तालुक्यात घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक, कृषी आणि इतर मिळून १३ हजार ९२८ वीजग्राहक आहेत. महापारेषणच्या उपकेंद्रातून महावितरणच्या पाच ३३/११ केव्ही उपकेंद्रांना आणि तेथून संपूर्ण तालुक्याला सुमारे २२ मेगावाॅट वीजपुरवठा केला जातो.
सध्याच्या वीजवाहिनीत अडचण काय आहे?
आलापल्ली-सिरोंचा वीजवाहिनी जीमलगट्टाच्या घनदाट जंगलातून, तसेच नद्या आणि नाल्यांच्या परिसरातून जाते. पावसाळ्यात अनेक भागांचा संपर्क तुटतो. भ्रमणध्वनी संपर्कही उपलब्ध नसल्याने वीजवाहिनीतील बिघाड शोधणे आणि दुरुस्ती करणे अत्यंत खडतर ठरते.
तेलंगणातून पर्यायी व्यवस्था कशी उभारली जात आहे?
सिरोंचापासून ३२ किलोमीटरवरील तेलंगणातील मंचेरियल जिल्ह्याच्या किस्तमपेठ येथून १३२ केव्ही अतिउच्चदाब वीजवाहिनी उभारली जात आहे. त्यासाठी ११३ मनोरे उभारण्याचे काम महापारेषणकडून सुरू असून, ते जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.
सिरोंचातील उपकेंद्रात काय बदल झाले?
महापारेषणच्या सिरोंचा उपकेंद्राची क्षमता ६६/३३ केव्हीवरून १३२/६६/३३ केव्ही करण्यात आली आहे. महावितरणचे नवीन ३३/११ केव्ही उपकेंद्रही कार्यान्वित झाले असून, त्यात पाच एमव्हीए क्षमतेचे दोन वीजपरिवर्तक आहेत. आणखी एक पाच एमव्हीएचा वीजपरिवर्तक बसविण्याची सूचना देण्यात आली आहे.
पर्यायी व्यवस्थेचा नेमका लाभ काय?
आलापल्ली आणि किस्तमपेठ या दोन्ही ठिकाणांहून वीजपुरवठ्याची सोय उपलब्ध होईल. त्यामुळे एका वाहिनीत बिघाड झाल्यास दुसऱ्या वाहिनीतून पुरवठा करता येईल. त्यानंतर सिरोंचा-आलापल्ली ६६ केव्ही वीजवाहिनीची क्षमता १३२ केव्ही करण्याचा प्रस्ताव आहे. महावितरणचे संचालक (संचालन) धनंजय औंढेकर यांनी रविवारी कामांची पाहणी केली. यावेळी मुख्य अभियंता हरिश गजबे, अधीक्षक अभियंते प्रकाश खांडेकर व अमलेश लोणारे, कार्यकारी अभियंते जितेंद्र वाघमारे व विलास रंगारी, तसेच उपकार्यकारी अभियंता भारत बालपांडे उपस्थित होते.
