नागपूर : गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा वनविभागातील समृद्ध जैवविविधतेकडे नव्या वैज्ञानिक अभ्यासामुळे राष्ट्रीय स्तरावर लक्ष वेधले गेले आहे. या अभ्यासात १३७ फुलपाखरांच्या प्रजातींची नोंद करण्यात आली असून, त्यापैकी १५ प्रजाती विदर्भात प्रथमच आढळल्या.
या प्रजातींची नोंद
नवीन नोंद झालेल्या प्रजातींमध्ये ब्लॅकव्हेन सर्जंट, स्टाफ सर्जंट, कॉमन लास्कर, ग्रे काऊंट, इंडियन सनबीम, इंडिगो फ्लॅश, कॉपर फ्लॅश, कॉमन ऑनिक्स, ऑर्किड टिट, एपफ्लाय, प्लेन्स ब्ल्यू रॉयल, रेडस्पॉट, जायंट रेडआय, ट्री फ्लिटर आणि कॉमन स्नो फ्लॅट यांचा समावेश आहे. या नोंदींमुळे सिरोंचा परिसरातील जैवविविधतेची समृद्धता अधोरेखित झाली. हा अभ्यास महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाच्या महाराष्ट्र जीन बँक प्रकल्पाच्या संचालक व भारतीय वनसेवेतील अधिकारी पूनम पाटे, सिरोंचा वनविभागातील वनपाल एल.एच. चौधरी व ए.डब्ल्यू. तलांडी, वर्धा जिल्ह्यातील सेलू येथील आर.जी. भोयर कला व वाणिज्य महाविद्यालयातील कीटकशास्त्रज्ञ डॉ. आशीष टिपले यांच्या संयुक्त प्रयत्नांतून पूर्ण झाला. त्यांच्या वैज्ञानिक ज्ञान आणि क्षेत्रीय अनुभवामुळे या पर्यावरणीयदृष्ट्या महत्त्वाच्या भागातील फुलपाखरांच्या विविधतेचे यशस्वी दस्तावेजीकरण शक्य झाले.
पद्धतशीर निरीक्षण आणि छायाचित्रण
वर्षभर चाललेल्या क्षेत्रीय सर्वेक्षणात पद्धतशीर निरीक्षण आणि छायाचित्रणाचा वापर करण्यात आला. या अभ्यासात फुलपाखरे ही पर्यावरणीय आरोग्याची महत्त्वाची जैव-सूचक असल्याचे स्पष्ट करण्यात आले. सिरोंचा परिसरातील उष्णकटिबंधीय ओलसर व कोरड्या पानझडी वनांचे मिश्र स्वरूप फुलपाखरांच्या विविधतेसाठी अनुकूल ठरत असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले. या पार्श्वभूमीवर शाश्वत वन व्यवस्थापन आणि प्रभावी संवर्धन उपाययोजना राबवण्याची गरज व्यक्त करण्यात आली. तसेच या अभ्यासातून पर्यावरणीय समतोल, परागीभवन आणि स्थानिक उपजीविकेसाठी जैवविविधतेचे महत्त्व अधोरेखित झाले असून, गडचिरोलीमध्ये पर्यावरण पर्यटनासाठीही नव्या संधी निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
१९ प्रजाती भारतीय वन्यजीव कायद्यांतर्गत संरक्षित
नोंदवलेल्या १९ प्रजाती भारतीय वन्यजीव (संरक्षण) कायद्यांतर्गत संरक्षित आहेत. त्यामुळे या भागाचे संवर्धनात्मक महत्त्व अधिक ठळक झाले आहे. दरम्यान, अधिवास नाश, वनतोड आणि वाढता मानवी हस्तक्षेप हे दुर्मिळ प्रजातींसाठी धोका ठरत असल्याकडे डॉ. आशीष टिपले यांनी लक्ष वेधले. या अभ्यासाला महाराष्ट्र राज्य वन विभागाकडून प्रोत्साहन आणि संस्थात्मक पाठबळ मिळाले असून जैवविविधता संशोधनासाठी शासनाच्या पाठिंब्याचे महत्त्व अधोरेखित झाले आहे, असे पूनम पाटे यांनी सांगितले.
