गडचिरोली : प्रस्तावित पोलाद प्रकल्पासाठी भूसंपादनाच्या मुद्द्यावरून गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी (५ नोव्हेंबर) नागपूर येथील रामगिरी या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासोबत दोन टप्प्यांत बैठक झाली. कायद्यानुसार सक्तीने भूसंपादन करण्याचे अधिकार शासनाला असले, तरी शासन तसे करणार नाही. बाधित शेतकऱ्यांना पूर्ण विश्वासात घेऊन आणि त्यांच्या संमतीनेच पुढील प्रक्रिया राबविली जाईल, अशी स्पष्ट ग्वाही मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिली.
गडचिरोली जिल्ह्याला पोलाद उद्योगाचे केंद्र बनविण्याच्या उद्देशाने प्रस्तावित एमआयडीसी, पोलाद प्रकल्पासाठी भूसंपादनाची प्रक्रिया पुढे सरकत असताना स्थानिक शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. भेंडाळा परिसरातील १४ गावे तसेच येणापूर-जयरामपूर परिसरातील १३ गावांमधील शेतकऱ्यांनी या प्रक्रियेविरोधात आंदोलनाचे हत्यार उपसले. जमीन, शेती आणि उपजीविकेच्या प्रश्नावरून सुरू असलेल्या या आंदोलनामुळे औद्योगिक विकासाच्या प्रस्तावापुढे स्थानिकांच्या संमतीचा प्रश्न ऐरणीवर आला होता. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेत आपली भूमिका मांडली.
प्रकल्प आणि स्थानिक प्रकल्पबाधित शेतकरी यांच्यात संघर्षाची परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी संवादातून सर्वमान्य तोडगा काढण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. शेतकऱ्यांच्या अडचणी, आक्षेप आणि मागण्या समजून घेण्यासाठी त्यांच्याशी सातत्याने चर्चा करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. जिल्ह्याचा सर्वांगीण विकास आणि भावी पिढ्यांसाठी रोजगारनिर्मितीचा दीर्घकालीन विचार करून सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले.
भूसंपादनाच्या प्रश्नावर सर्व संबंधित घटकांशी सविस्तर चर्चा करून तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती स्थापन करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. त्यामुळे आता या समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मागण्यांवर कोणता तोडगा निघतो, याकडे आंदोलनकर्त्यांचे लक्ष लागले आहे. औद्योगिक विकासाची दिशा कायम ठेवतानाच शेतकऱ्यांचे जमीनविषयक हित आणि त्यांच्या संमतीला प्राधान्य देण्याचे आव्हान शासनापुढे असेल.
या बैठकीला सहपालकमंत्री आशिष जयस्वाल, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्यासह विविध विभागांतील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
