डचिरोली : एटापल्ली तालुक्यातील कसनसूर वनपरिक्षेत्रात सलग घडलेल्या पशुहल्ल्यांनंतर सूरजागड परिसरात वाघाचा वावर असल्याची चर्चा होती. आता वन विभागाने लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात वाघ कैद झाल्याने या परिसरात दिसणारा मोठा वन्यप्राणी वाघच असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याच कॅमेऱ्यात तडसचीही नोंद झाली आहे.

मागील आठवड्यात कसनसूर वनपरिक्षेत्रात सलग चार पशुहल्ल्यांच्या घटना घडल्या होत्या. त्यानंतर परिसरात वाघाच्या हालचालींबाबत चर्चा सुरू झाली होती. वन विभागाने निरीक्षणासाठी ट्रॅप कॅमेरे बसविल्यानंतर त्यामध्ये वाघाची नोंद झाली. त्यामुळे या भागात वाघाचा वावर असल्याची पुष्टी झाली आहे.

येलचील, चंद्राखंडी, सूरजागड आणि परिसरातील गावांमध्ये ग्रामस्थांनी यापूर्वीही वाघ दिसल्याचे सांगितले होते. मात्र, आता प्रथमच ट्रॅप कॅमेऱ्यात त्याची नोंद झाल्याने वन विभागालाही पुढील निरीक्षणासाठी महत्त्वाचा आधार मिळाला आहे. या परिसरातील वाघाचा वावर कायमस्वरूपी आहे की तो तात्पुरता आहे, याबाबत पुढील निरीक्षणातून अधिक स्पष्टता येणार आहे.

सलग पशुहल्ले आणि त्यानंतर ट्रॅप कॅमेऱ्यात झालेली नोंद लक्षात घेता वन विभागाने या भागातील हालचालींवर अधिक बारकाईने लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे. स्थानिक नागरिकांनीही जंगलालगतच्या भागात वावरताना आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया

“या भागात वाघाचे स्थायी अस्तित्व असल्याबाबत वन विभागाकडे अद्याप कोणतेही ठोस पुरावे नाहीत. ट्रॅप कॅमेऱ्यात दिसलेला वाघ हा स्थलांतरित असू शकतो. त्यामुळे कोणताही निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही. वन विभाग संपूर्ण परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.” शैलेश मीना, उपवनसंरक्षक, भामरागड वनविभाग