गडचिरोली : जिथे उद्याची सकाळही अनिश्चित असते अशा हिंसक वाटेवरून परतलेल्या एका नक्षलवादी दाम्पत्याच्या आयुष्यात आज आनंदाचा पाऊस पडला आहे. गडचिरोली पोलीस दलाच्या ‘प्रोजेक्ट संजीवनी’च्या आश्वासक छायेखाली अर्जुन ऊर्फ सागर आणि त्याची पत्नी सम्मी यांच्या घरी पुत्ररत्नाचा जन्म झाला असून, त्यांच्या नवजीवनाला आता एक गोड आणि मजबूत धागा मिळाला आहे.

१ जानेवारीरोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आत्मसमर्पण केलेल्या १२ माओवाद्यांमध्ये अर्जुन आणि सम्मी या पती-पत्नीचा समावेश होता. एकेकाळी हेच दाम्पत्य नक्षलवादी चळवळीचा महत्त्वाचा भाग होते. दलममध्ये कार्यरत असताना, साधे आणि सुरक्षित कौटुंबिक आयुष्य जगणे त्यांना शक्य नव्हते. हिंसेच्या जीवनाला कंटाळून या दाम्पत्याने शांततेचा मार्ग स्वीकारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. या निर्णयाला गडचिरोली पोलीस दलाने भक्कम आधार दिला.

महाराष्ट्र शासनाच्या २००५ पासूनच्या आत्मसमर्पण योजनेतून आणि ‘प्रोजेक्ट संजीवनी’च्या माध्यमातून या दाम्पत्याच्या पुनर्वसनाचे काम युद्ध पातळीवर सुरू झाले. आरोग्य, स्वयंरोजगार प्रशिक्षण आणि समाजात सन्मानाने जगण्यासाठी आवश्यक असलेली ओळखपत्रे, बँक खाती आणि परवाने (आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स) त्यांना त्वरित उपलब्ध करून देण्यात आली.

याशिवाय, केंद्र व राज्य शासनाकडून पुनर्वसनासाठी त्यांना एकत्रितपणे १६.३ लाख रुपये इतका भरघोस निधीही मिळवून देण्यात आला. या प्रयत्नांमुळेच, हिंसक जीवनाला कंटाळलेल्या अर्जुन आणि सम्मी यांच्यासारख्या ७८३ माओवाद्यांनी आजपर्यंत गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे.

२१ नोव्हेंबर रोजी सम्मी ऊर्फ बंडी मट्टामी यांची जिल्हा महिला सामान्य रुग्णालयात प्रसूती झाली आणि त्यांना पुत्रप्राप्तीचा आनंद मिळाला. बंदुकीच्या छायेतून बाहेर पडून सामान्य जीवनाचा स्वीकार केलेल्या या दाम्पत्यासाठी हा केवळ एका बाळाचा जन्म नाही, तर त्यांच्या हिंसाचारग्रस्त भूतकाळावर मात करून सुरू झालेल्या शांततेच्या आणि सुरक्षिततेच्या नव्या अध्यायाची ही गोड आणि निर्णायक सुरुवात आहे. त्यांच्या नवजात बालकाच्या रूपात त्यांना त्यांच्या आयुष्याचा नवा, सुरक्षित अर्थ मिळाला आहे.

पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी या दाम्पत्याला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या असून, आत्मसमर्पित सदस्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सन्मानाने आणून त्यांना ‘संजीवनी’ देण्याची पोलीस दलाची कटिबद्धता या घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. या बाळाच्या हातात बंदूक नाही, तर खेळणी असावीत आणि त्याचे भविष्य सुरक्षित असावे, ही स्वप्नपूर्ती आज अर्जुन आणि सम्मी यांनी अनुभवली आहे.