गडचिरोली : शरणागत नक्षल नेत्यांची गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेली राजकीय मोर्चेबांधणी आता अधिक स्पष्ट होत असल्याचे चित्र आहे. समविचारी डाव्या राजकीय पक्षांशी सातत्याने होत असलेल्या बैठका, विविध सामाजिक आणि राजकीय प्रश्नांवर सुरू असलेला संवाद आणि आता हैदराबाद येथील मार्क्स भवनमध्ये झालेली संयुक्त बैठक यामुळे हे नेते लवकरच सक्रिय राजकारणात प्रवेश करू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

विशेषतः तेलंगणातील उत्तर भाग आणि महाराष्ट्राच्या सीमावर्ती पट्ट्यात या घडामोडींमुळे डाव्या राजकारणाच्या समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हैदराबाद येथील मार्क्स भवनमध्ये नुकतीच शरणागत नक्षल नेते आणि भाकप (माले) मास लाईनच्या नेतृत्वाची बैठक पार पडली. देशातील राजकीय परिस्थिती, जनआंदोलने, विविध सामाजिक प्रश्न आणि भविष्यातील संयुक्त कृती यावर सविस्तर चर्चा झाल्याचा दावा भाकप (माले) मास लाईनने समाज माध्यमांवर प्रसिद्ध केलेल्या निवेदनात केला आहे. समान मुद्द्यांवर संयुक्त आंदोलन उभारण्याबाबत दोन्ही बाजूंमध्ये एकमत झाल्याचेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

निवेदनानुसार, माजी नक्षल नेते तिप्पिरी तिरुपती ऊर्फ देवजी, दामोदर, मल्ला राजीरेड्डी, पद्मा यांच्यासह भाकप (माले) मास लाईनचे राज्य सचिव पोटू रंगाराव, एम. हनमेश तसेच कामगार, विद्यार्थी, महिला आणि युवक संघटनांचे प्रतिनिधी बैठकीस उपस्थित होते. राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडींचा आढावा घेत विविध लोकचळवळी, कामगार-शेतकरी प्रश्न, बेरोजगारी, नागरी हक्क आणि संयुक्त संघर्षाच्या पुढील आराखड्यावर चर्चा झाली.

यावेळी माजी नक्षल नेत्यांनी भाकप (माले) मास लाईनने घेतलेल्या विविध भूमिकांचे स्वागत केले. विचारधारात्मक भिन्नता असली तरी लोकांच्या प्रश्नांवर एकत्रितपणे संघर्ष उभारण्याची गरज बैठकीत व्यक्त करण्यात आली. तसेच व्यापक ऐक्य मेळावा घेणे, संयुक्त कार्यक्रम आखणे आणि त्यासाठी स्वतंत्र कार्यपद्धती निश्चित करण्याचाही निर्णय झाल्याचे सांगण्यात आले आहे.

विशेष म्हणजे, गेल्या काही काळापासून हे माजी नक्षल नेते समविचारी डाव्या पक्षांच्या नेतृत्वाशी सातत्याने संवाद साधत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. त्या पार्श्वभूमीवर हैदराबादमधील ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे. या बैठकीची माहिती संबंधित पक्षाने स्वतः समाज माध्यमांवर छायाचित्रांसह प्रसिद्ध केल्याने या हालचालींना अधिकृत स्वरूप मिळाल्याचे मानले जात आहे.

तेलंगणातील विशेषतः सीमावर्ती भागात डाव्या विचारसरणीवर विश्वास ठेवणारा मोठा सामाजिक आणि राजकीय वर्ग आजही प्रभावी मानला जातो. अशा परिस्थितीत शरणागत माजी नक्षल नेते एखाद्या डाव्या राजकीय पक्षासोबत औपचारिकपणे सक्रिय झाल्यास त्या भागातील राजकीय समीकरणांवर त्याचा परिणाम होऊ शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. मात्र, या बैठकीत कोणत्याही पक्षप्रवेशाची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.