गडचिरोली : आज सूरजागडच्या लोहखनिज खाणींमुळे देशभर चर्चेत असलेल्या गडचिरोलीशी टाटा समूहाचे नाते नवे नाही. उलट भारतातील पोलाद उद्योगाची मुहूर्तमेढ रोवण्याच्या प्रयत्नांत असताना टाटा समूहाने १२० वर्षांपूर्वीच या भागातील खनिज संपत्तीची दखल घेतली होती. इतिहासातील नोंदींनुसार, योग्य पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्या असत्या तर गडचिरोलीच देशाचे पहिले मोठे पोलाद केंद्र आणि ‘जमशेदपूर’ ठरले असते.

चांदा जिल्ह्याच्या खनिज संपत्तीने वेधले टाटांचे लक्ष

जमशेद टाटा यांच्या औद्योगिक स्वप्नाला आकार देताना तत्कालीन चांदा जिल्ह्यातील (आताचा गडचिरोली-चंद्रपूर भाग) लोहखनिज आणि कोळशाच्या साठ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. १८८२ मध्ये चांदा जिल्ह्यातील लोहउद्योगाच्या शक्यतांवर आधारित एका जर्मन तज्ज्ञाच्या अहवालाने टाटा समूहाचे लक्ष या भागाकडे वेधले. त्यानंतर १९०१-१९०२ दरम्यान टाटा समूहाने येथे खनिज शोधासाठी परवाना घेतला आणि डोराबजी टाटा यांच्या नेतृत्वाखाली खनिज सर्वेक्षण सुरू झाले.

रेल्वेच्या अभावामुळे हुकली पोलादनगरीची संधी

सूरजागडसह गडचिरोली परिसरातील उच्च प्रतीच्या लोहखनिज साठ्यांचा त्या काळातही अभ्यास करण्यात आला होता. लोहखनिज, कोळसा आणि इतर आवश्यक संसाधने तुलनेने जवळ उपलब्ध असल्याने हा भाग पोलाद उद्योगासाठी अनुकूल मानला जात होता. मात्र, त्यावेळी या दुर्गम भागात रेल्वे व वाहतूक सुविधांचा अभाव मोठा अडसर ठरला. उद्योग उभारणीसाठी आवश्यक दळणवळण व्यवस्था उपलब्ध नसल्याने टाटा समूहाने अखेर छोटानागपूरमधील साकची परिसराची निवड केली. पुढे याच ठिकाणी जमशेदपूर शहर आणि टाटा स्टीलचा भव्य लोह प्रकल्प उभा राहिला.

‘गडचिरोलीही बनले असते जमशेदपूर’

विशेष म्हणजे, अलीकडेच टाटा स्टीलचे वरिष्ठ अधिकारी डी. बी. सुंदरराम यांनी एका कार्यक्रमात ‘रेल्वे सुविधा मिळाल्या असत्या तर गडचिरोली १०० वर्षांपूर्वीच जमशेदपूर बनले असते,’ असे विधान केले होते. त्यामुळे सूरजागडच्या खनिज संपत्तीचे ऐतिहासिक महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले आहे.

टाटा-लॉयड्स सहकार्यामुळे जुन्या स्वप्नाला नवी पालवी

दरम्यान, टाटा समूह आणि लॉयड्स मेटल्स यांच्यातील अलीकडील सहकार्यामुळे टाटांचे गडचिरोलीशी नाते पुन्हा दृढ होत असल्याचे चित्र आहे. शतकापूर्वी अपूर्ण राहिलेले औद्योगिक स्वप्न नव्या स्वरूपात साकार होण्याच्या चर्चांनाही त्यामुळे बळ मिळत आहे.