गडचिरोली : नक्षलग्रस्त आणि दुर्गम अशी ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. अहेरी येथील तेजकुमार सत्यनारायण बंडीवार याची जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या बळावर भारतीय हवाई दलात वर्ग-१ अधिकारी पदी निवड झाली आहे. या पदी निवड होणारा तो दक्षिण गडचिरोलीतील पहिलाच तरुण आहे. ‘एअर फोर्स कॉमन ॲडमिशन टेस्ट’ (AFCAT) च्या अंतिम गुणवत्ता यादीत त्याने देशात ८० वा क्रमांक पटकावत ‘फ्लाइंग ऑफिसर’ पदाला गवसणी घातली. त्याच्या या यशामुळे अहेरीसह संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यातून त्याचे कौतुक होत आहे.
अपयशावर मात करत गाठले यश
तेजकुमारचा यशाचा प्रवास संघर्षमय राहिला आहे. शालेय जीवनापासूनच देशसेवेचे स्वप्न उराशी बाळगून त्याने दहावीनंतर राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) परीक्षेची तयारी सुरू केली होती. लेखी परीक्षेत यश मिळाल्यानंतरही ‘सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड’ मुलाखतीत त्याला अपयशाचा सामना करावा लागला. मात्र, या अपयशाने खचून न जाता त्याने पदवीचे शिक्षण पूर्ण करत ‘सीडीएस’ आणि ‘आयनेट’ यांसारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी सुरूच ठेवली. अखेर २३ ऑगस्ट २०२५ रोजी झालेल्या परीक्षेत तसेच मार्च २०२६ मध्ये पार पडलेल्या ‘एअर फोर्स सिलेक्शन बोर्ड’च्या व्यक्तिमत्त्व चाचणी आणि वैद्यकीय तपासणीत त्याने यश मिळवत भारतीय हवाई दलात प्रवेश निश्चित केला.
दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी उदाहरण
प्राथमिक शिक्षकाचा मुलगा असलेल्या तेजकुमारचे प्राथमिक शिक्षण अहेरी येथील डिस्नेलँड स्कूलमध्ये, तर माध्यमिक शिक्षण नागेपल्ली येथील सेंट फ्रान्सिस स्कूलमध्ये झाले. त्यानंतर अहेरीतील धर्मराव सायन्स कॉलेजमधून त्याने उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी अनेक विद्यार्थी मोठ्या शहरांकडे धाव घेत असताना तेजकुमारने मात्र अहेरीसारख्या दुर्गम भागात राहून स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर हे यश संपादन केले. योग्य मार्गदर्शन, सातत्यपूर्ण अभ्यास आणि आत्मविश्वास असेल तर दुर्गम भागातील विद्यार्थीदेखील राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांमध्ये यश मिळवू शकतात, हे त्याने आपल्या कामगिरीतून सिद्ध करून दाखवले आहे.
कुटुंबीय आणि गुरुजनांचे मोलाचे योगदान
आपल्या यशामागे आई-वडील, भाऊ, शिक्षक आणि मार्गदर्शक यांचे मोठे योगदान असल्याची भावना तेजकुमारने व्यक्त केली. अभ्यासाबरोबरच त्याला अध्यापनाचीही आवड असून, मागील काही महिन्यांपासून तो अहेरी येथील एका अकॅडमीमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होता. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी स्पष्ट ध्येय निश्चित करून सातत्याने प्रयत्न केल्यास कोणतीही परीक्षा अवघड नसते, असा संदेश त्याने तरुणांना दिला आहे.
हैदराबादमध्ये होणार वर्षभराचे प्रशिक्षण
अंतिम गुणवत्ता यादीत देशात ८० वा क्रमांक मिळवल्यानंतर पुढील काही दिवसांत तेजकुमारला भारतीय हवाई दलाकडून अधिकृत नियुक्तीपत्र प्राप्त होणार आहे. त्यानंतर हैदराबाद येथील एअर फोर्स अकॅडमीत त्याचे वर्षभराचे कठोर लष्करी प्रशिक्षण सुरू होईल. हे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर तो ‘फ्लाइंग ऑफिसर’ म्हणून भारतीय वायू दलात रुजू होणार आहे. अहेरीसारख्या दुर्गम भागातून भारतीय हवाई दलात अधिकारीपद मिळवणाऱ्या तेजकुमार बंडीवारच्या यशाने गडचिरोली जिल्ह्यातील युवकांसमोर नवा आदर्श निर्माण केला असून, देशसेवेची स्वप्ने पाहणाऱ्या तरुणांसाठी त्याची वाटचाल प्रेरणादायी ठरत आहे.
