गडचिरोली : दुर्गम भौगोलिक परिस्थिती, मर्यादित शैक्षणिक सुविधा आणि आर्थिक अडचणींवर मात करत गडचिरोलीतील नऊ आदिवासी विद्यार्थ्यांनी वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेश प्रक्रियेत उल्लेखनीय यश मिळवले आहे. वैद्यकीय प्रवेशाच्या पहिल्याच फेरीत या विद्यार्थ्यांना राज्यातील विविध नामांकित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळाला. पुण्यातील ‘लिफ्ट फॉर अपलिफ्टमेंट’ संस्थेच्या धाराशिव येथील ‘उलगुलान’ उपक्रमाच्या माध्यमातून त्यांना मोफत निवासी मार्गदर्शन मिळाले.
भगवान बिरसा मुंडा यांनी अन्यायाविरुद्ध पुकारलेल्या लढ्याला ‘उलगुलान’ म्हटले जाते. त्याच धर्तीवर अज्ञान आणि गरिबीविरुद्ध शिक्षणाचे आंदोलन उभे करण्याचा प्रयत्न या उपक्रमातून केला जात आहे. गेल्या ११ वर्षांपासून वंचित आणि आदिवासी विद्यार्थ्यांना वैद्यकीय प्रवेशासाठी मार्गदर्शन देण्याचे काम संस्था करत आहे.
संघर्षाची मोठी कहाणी
या विद्यार्थ्यांच्या यशामागे संघर्षाची मोठी कहाणी आहे. अहेरी तालुक्यातील गुंडेरा येथील साहिल टेकाम हा आपल्या कुटुंबातील पहिला उच्चशिक्षित तरुण ठरणार आहे. मुलचेरा तालुक्यातील जीवन सिदाम याला गावात वेळेवर उपचार न मिळाल्याने झालेल्या एका मृत्यूने डॉक्टर होण्याची प्रेरणा दिली. धुंदे येथील तमस मडावीला आपल्या परिसरातील आरोग्यसेवेची कमतरता दूर करण्याचे स्वप्न आहे. चामोर्शीच्या अरमान आत्रामच्या पालकांनी मुलाच्या शिक्षणासाठी हैदराबाद येथे मजुरी केली. भामरागड तालुक्यातील दीक्षा कुंजामीने वडील आणि आजोबांचे छत्र हरवल्यानंतरही जिद्दीने शिक्षण सुरू ठेवले. चंदना उईकेने सुरुवातीला इंग्रजी माध्यम आणि राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या अभ्यासक्रमाचा अडथळा पार केला.
भविष्यात दुर्गम भागातील आरोग्यसेवेला नवी दिशा
साहिल टेकामला पुणे, दीक्षा कुंजामी आणि निशांत सिडाम यांना धाराशिव, जीवन सिदम, चंदना उईके आणि अरमान आत्राम यांना सोलापूर, तमस मडावीला मुंबई, श्रुती वड्डेला सिंधुदुर्ग, तर काव्या कुसणाकेला कोपरगाव येथे प्रवेश मिळाला आहे. गडचिरोली आणि मेळघाटातून प्रत्येकी शंभरहून अधिक स्थानिक आदिवासी डॉक्टर घडवण्याचे उद्दिष्ट संस्थेने ठेवले आहे. स्थानिक बोलीभाषा, संस्कृती आणि परिस्थितीची जाण असलेले हे डॉक्टर भविष्यात दुर्गम भागातील आरोग्यसेवेला नवी दिशा देतील, अशी अपेक्षा संस्थेचे कार्याध्यक्ष सुबोध कळमनुरीकर यांनी व्यक्त केली आहे.
