गडचिरोली : उन्हाच्या तीव्र झळांनी होरपळणाऱ्या गडचिरोली शहरासमोर आता भीषण पाणीटंचाईचे संकट उभे ठाकले आहे. शहराची प्रमुख जलवाहिनी असलेल्या वैनगंगा नदीचे पात्र जवळपास कोरडे पडल्याने गेल्या दहा दिवसांपासून अनेक भागांतील नळ कोरडे आहेत. पाण्याच्या एका हंड्यासाठी नागरिकांची धावपळ सुरू असताना, लोकप्रतिनिधी आणि सत्ताधारी कारभारी मात्र विधान परिषद निवडणुकीच्या राजकीय गणितात गुंतल्याने जनतेत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
दरवर्षी उन्हाळ्याच्या अखेरीस वैनगंगा नदीतील पाणीसाठा कमी होतो, ही बाब प्रशासनाला नवीन नाही. मात्र यंदाही पूर्वनियोजनाचा पूर्ण अभाव दिसून आला. नदीपात्रात तात्पुरता बंधारा उभारण्याचे काम वेळेत न झाल्याने शहराच्या पाणीपुरवठा व्यवस्थेवर थेट परिणाम झाला. उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच उपाययोजना करण्यात आल्या असत्या, तर आज नागरिकांवर पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली नसती, अशी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
नळांना पाणी नसल्याने नागरिकांनी विहिरी आणि कूपनलिकांचा आधार घेतला, मात्र वाढत्या उष्णतेमुळे भूजल पातळीही झपाट्याने घसरली आहे. अनेक भागांतील कूपनलिका बंद पडल्या असून विहिरींनीही तळ गाठला आहे. परिणामी महिलांसह ज्येष्ठ नागरिकांना भर उन्हात पाण्याच्या शोधात भटकावे लागत आहे. शहरातील अनेक वस्त्यांमध्ये पाण्यासाठी सकाळपासून रांगा लागत असून नागरिकांचा संयम सुटू लागला आहे.
गोसेखुर्दचे पाणी येईपर्यंत प्रतीक्षा
पाणीटंचाईवर उपाय म्हणून गोसेखुर्द धरणातून पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात आहे. मात्र ते पाणी वैनगंगेच्या पात्रातून शहरापर्यंत पोहोचण्यासाठी आणखी काही दिवस लागणार आहेत. तोपर्यंत नागरिकांनी प्रतीक्षा करण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
जनता तहानलेली, कारभारी बेफिकीर
शहरातील गंभीर परिस्थिती असूनही अनेक लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी विधानपरिषद निवडणुकीच्या घडामोडींमध्ये व्यस्त असल्याची चर्चा आहे. पाणीटंचाईसारख्या मूलभूत प्रश्नावर ठोस पुढाकार घेण्याऐवजी राजकीय हालचालींनाच प्राधान्य दिले जात असल्याने नागरिकांमध्ये रोष वाढत आहे. मतांसाठी दारोदारी फिरणारे नेते आता कुठे आहेत, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. दुसरीकडे पदाधिकाऱ्यांना विचारणा केली असता लवकरच व्यवस्था केली जाईल, असे उत्तर मिळाले. त्यामुळे ‘तहान लागल्यावर विहीर खोदण्याच्या’ प्रकारावर सर्वत्र टीका होत आहे.
स्वखर्चातून टँकरद्वारे पाणीपुरवठा
दरम्यान, रामनगर परिसरातील काँग्रेसचे नगरसेवक श्रीकांत देशमुख यांनी स्वखर्चातून टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे. पाण्याअभावी त्रस्त कुटुंबांना दिलासा देण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतल्याने परिसरातील नागरिकांनी त्यांचे स्वागत केले आहे. मात्र लोकप्रतिनिधींच्या वैयक्तिक प्रयत्नांवर शहराचा पाणीपुरवठा अवलंबून राहणे ही प्रशासनासाठी चिंतेची बाब असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. वेळेत नियोजन, नदीपात्रातील कामे आणि पर्यायी जलस्रोतांची व्यवस्था करण्यात आली असती, तर सद्यस्थिती टाळता आली असती, असे मत नागरिक व्यक्त करत आहेत. नैसर्गिक संकटापेक्षा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे निर्माण झालेले हे ‘कृत्रिम पाणीसंकट’ असल्याची भावना शहरभर उमटत असून नगरपालिका आणि संबंधित यंत्रणांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
