गडचिरोली : पोलीस भरतीच्या तयारीदरम्यान जुळलेले प्रेमसंबंध, नोकरी मिळाल्यानंतर निर्माण झालेला दुरावा आणि त्यातून उभा राहिलेला प्रेमाचा त्रिकोण… या घटनाक्रमाचा एका २२ वर्षीय तरुणीच्या आयुष्याचा दुर्दैवी शेवट झाला. प्रियकराने लग्नास नकार दिल्याने आणि त्याच्या नव्या मैत्रिणीकडून कथितरीत्या अपमानास्पद वागणूक मिळाल्याने मानसिक तणावात आलेल्या तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीच्या आधारे तब्बल ५२ दिवसांनंतर दोन पोलीस शिपायांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. ३० ऑक्टोबर रोजी ही कारवाई करण्यात आली.

खाकी वर्दी मिळाल्यानंतर नात्यातील समीकरणात बदल

कुरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील ही तरुणी मागील वर्षी पोलीस भरतीची तयारी करण्यासाठी गडचिरोली येथे वास्तव्यास होती. याच काळात इन्स्टाग्रामच्या माध्यमातून तिची शिवकुमार करसाल (२८) याच्याशी ओळख झाली. दोघेही पोलीस भरतीची तयारी करीत असल्याने त्यांच्यात मैत्री निर्माण झाली आणि पुढे या मैत्रीचे रूपांतर प्रेमसंबंधांत झाले. काही काळानंतर शिवकुमारची पोलीस भरतीत निवड झाली. त्याची नियुक्ती कमांडो प्रशिक्षण केंद्रात झाली, मात्र तरुणीला भरतीत यश आले नाही. शिवकुमारला खाकी वर्दी मिळाल्यानंतर दोघांच्या नात्यातील समीकरणे बदलू लागली. त्याने तरुणीकडे दुर्लक्ष करण्यास सुरुवात केली. याचदरम्यान त्याची एका महिला पोलीस शिपायाशी जवळीक वाढली. त्यामुळे आधीच्या प्रेमसंबंधांत दुरावा निर्माण झाला. शिवकुमारने लग्नास नकार दिल्याने तरुणी मानसिकदृष्ट्या खचली होती. त्यातच संबंधित महिला पोलीस शिपायाने दूरध्वनीवरून आपल्याशी अपमानास्पद भाषेत संवाद साधल्याचेही तरुणीने मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत नमूद केल्याचे समजते.

चिठ्ठीत संपूर्ण घटनाक्रमाचा उल्लेख

प्रेमसंबंधांतील कटुता, लग्नास नकार आणि अपमान यामुळे आलेल्या मानसिक तणावातून तरुणीने ७ सप्टेंबर रोजी राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपविले. मृत्यूपूर्वी तिने लिहिलेल्या चिठ्ठीत या संपूर्ण घटनाक्रमाचा उल्लेख केला होता. मुलीच्या मृत्यूनंतर तिच्या आईने कुरखेडा पोलीस ठाण्यात धाव घेत न्यायाची मागणी केली. अखेर या चिठ्ठीच्या आधारे पोलिसांनी ५२ दिवसांनंतर पोलीस शिपाई शिवकुमार करसाल आणि संबंधित महिला पोलीस शिपायाविरुद्ध गुन्हा दाखल करून दोघांनाही अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रियंका आघाव करीत आहेत.