गडचिरोली : संकटाच्या काळोखातही जिद्दीचा दिवा तेवत ठेवला तर यशाचा सूर्य निश्चितच उगवतो,’ हे गडचिरोलीच्या रजत सुनील वाळके याने सिद्ध केले आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत देशात ५१४ वी रँक पटकावत रजतने आपल्या कर्तृत्वाचा झेंडा फडकावला आहे. विशेष म्हणजे, सध्या ओडिशात ‘सीआरपीएफ’मध्ये असिस्टंट कमांडंट म्हणून देशसेवा बजावत असतानाच त्याने हे यश खेचून आणले आहे.

मूळचे चंद्रपूरचे असलेले वाळके कुटुंबीय वडिलांच्या सुनील वाळके यांच्या नोकरीनिमित्त गडचिरोलीत स्थायिक झाले. रजतच्या आयुष्यातील संघर्षाचा काळ १ नोव्हेंबर २०२१ रोजी सुरू झाला. ज्या दिवशी त्याला ‘सीआरपीएफ’मध्ये नोकरी मिळाल्याची आनंदवार्ता मिळाली, त्याच काळात वडिलांच्या निधनाचा आघात त्याच्यावर कोसळला. प्रशिक्षणाला जात असताना वाटेतच वडिलांच्या निधनाची बातमी समजल्यानंतरही, रजतने ध्येयावरून लक्ष विचलित होऊ दिले नाही. वडिलांच्या स्वप्नांनाच आपली प्रेरणा मानून त्याने खडतर प्रशिक्षण पूर्ण केले आणि नोकरी सांभाळून पुन्हा एकदा यूपीएससीच्या रणांगणात उतरून यश मिळवले.

रजतच्या या यशाची बातमी समजताच गडचिरोलीतील गोकुलनगर परिसरात आनंदाचे वातावरण पसरले. घरातील दोन मोठ्या बहिणी स्नेहा (वनविभाग) आणि शीतल (जीएसटी विभाग) आधीच शासकीय सेवेत कार्यरत आहेत. आता रजतनेही प्रशासकीय सेवेत पाऊल टाकल्याने वाळके कुटुंबीयांच्या आनंदाला पारावार उरला नाही. मुलाने वडिलांचे स्वप्न पूर्ण केल्याची भावना व्यक्त करताना आई रत्नमाला यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.

असिस्टंट कमांडंट म्हणून सीमा सुरक्षा सांभाळताना अभ्यासाचे नियोजन करणे हे नक्कीच आव्हानात्मक होते. मात्र, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर रजतने ते शक्य करून दाखवले. ”हे यश माझ्या कुटुंबाच्या त्यागाचे फळ आहे, अशा शब्दांत रजतने आपल्या भावना व्यक्त केल्या. व्हीएनआयटी नागपूर येथून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेल्या रजतने पहिल्याच प्रयत्नात सीआरपीएफमध्ये यश मिळवले होते आणि आता यूपीएससी परीक्षेत बाजी मारून त्याने आपल्या यशाची व्याप्ती वाढवली आहे. त्याच्या या कामगिरीचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.