नागपूर : दिल्ली-मुंबई हा १ लाख कोटीचा रस्ता बांधला. मात्र, २ किलोमीटर असलेला केळीबाग रस्ता अजूनही पूर्ण करू शकलो नाही, अशी खंत व्यक्त करीत मला महालमध्ये लवकर राहायला यायचे आहे. त्यापूर्वी हा रस्ता तयार करा, असे निर्देश केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
महापालिकेच्या वतीने चिटणवीसपुरा येथे २ कोटी १४ लाख रुपये खर्चून आधुनिक सोयी सुविधांनी युक्त अशा राजर्षी छत्रपती शाहू महाराज ई-ग्रंथालयाचे लोकार्पण गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार विकास कुंभारे, मोहन मते, प्रवीण दटके, माजी महापौर दयाशंकर तिवारी, आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्यासह महापालिकेचे पदाधिकारी उपस्थित होते. नागनदीसाठी २४०० कोटींची योजना तयार करण्यात आली आहे. पाण्यासाठी ३२ टाक्या बांधण्यात येणार असून, त्यातील अनेक मार्चच्या आत पूर्ण होतील, असेही गडकरी म्हणाले. चिटणवीसपुरा ग्रंथालयात गरीब गरजू विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनाची संधी मिळावी, अशी अपेक्षा यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.
हेही वाचा – बुलढाणा: पोलिसांच्या एकावन्न पदांसाठी पावणेसहाशे उमेदवारांची ‘परीक्षा’
हेही वाचा – नागपूर : स्पा सेंटरमध्ये सुरू होता देह व्यापार, पोलिसांनी माणूस धाडला अन..
मद्यपींकडे लक्ष ठेवा
अत्याधुनिक साधनांनी ई वाचनालय, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्राची निर्मिती करण्यात आली. मात्र यात मद्यसेवन करणाऱ्यांना प्रवेश देऊ नका. कारण या भागात मद्य सेवन करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. नाही तर वातानुकुलीत व्यवस्था आहे म्हणून अनेक जण मद्य घेऊन येतील व ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या विरंगुळा केंद्रात आराम करतील. त्यामुळे याकडे अधिक लक्ष द्यावे, असेही गडकरी म्हणाले