पक्षनेतृत्वाने आणलेल्या दबावामुळे नागपूर सुधार प्रन्यासच्या विश्वस्तपदाचा डॉ. रवींद्र भोयर यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर नियुक्ती होण्यासाठी महापालिका सदस्यांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. गडकरी समर्थक असलेले भोयर यांना राजीनामा देण्यास भाग पाडल्यानंतर विश्वस्त म्हणून गडकरी की फडणवीस समर्थकाची वर्णी लागते, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.अडीच वषार्ंपूर्वी डॉ. रवींद्र भोयर यांची प्रन्यासच्या विश्वस्तपदी नियुक्ती झाली. त्यांना पाच वषार्ंचा कार्यकाळ मिळेल, असे वाटत असताना पक्षाने त्यांच्यावर दबाव आणल्यानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला. आता प्रन्यासच्या विश्वस्तपदासाठी इच्छुकांची संख्या वाढली असून त्यांचे पक्ष नेतृत्वावाकडे जाणे वाढले आहे.महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर नागपूर सुधार प्रन्यासच्या  विश्वस्तपदासाठी पक्षाच्या नगरसेवकांपैकी अनेक नावे समोर आली होती. भोयर यांच्या नावाला विरोध असतानाही गडकरींमुळे त्यांची वर्णी लागली होती. भोयर यांच्या राजीनाम्यामुळे प्रन्यासमधील विश्वस्तांची रिक्त पदांची संख्या चारवर गेली आहे. यापूर्वी अनंतराव घारड, किशोर कन्हेरे आणि दीनानाथ पडोळे आदींचा कार्यकाळ संपल्याने त्यांच्या जागा रिक्तच आहेत. महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष हे प्रन्यासचे पदसिद्ध विश्वस्त असतात. एक आमदार, एक नगरसेवक आणि दोन शासनाकडून नियुक्त केले जातात. ही सर्व पदे आता एकत्रित भरली जाण्याची शक्यता असल्यामुळे नगरसेवक आणि पक्षातील काही सदस्यांमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. शासनाकडून दोघांची विश्वस्त म्हणून वर्णी लावली जाते. त्यासाठी गडकरी आणि फडणवीस गटातील कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत. भाजपचे शहरातील आमदार, तसेच नगरसेवक व पक्षाच्या इतर नेत्यांचाही या पदावर डोळा आहे. अविनाश ठाकरे, बाल्या बोरकर, रमेश सिंगारे हे रिंगणात होते. मात्र, या तिघांची एक एक वर्षांसाठी स्थायी समितीच्या अध्यक्षपदी वर्णी लावल्यामुळे आता ते स्पर्धेतून बाहेर पडल्याचे बोलले जात आहे. सध्या संदीप जोशी, भूषण शिंगणे, गोपाल बोहरे, गिरीश देशमुख, बंडू राऊत आणि नीता ठाकरे स्पर्धेत असल्याचे बोलले जात असून त्यांनी आपल्या नेत्याच्या माध्यमातून प्रयत्न सुरू केले आहेत. भोयर हे गडकरी समर्थक असल्यामुळे त्यांच्या जागेवर गडकरी समर्थक राहील, असे बोलले जात आहे तर शासनाकडून भरण्यात येणाऱ्या दोन पदांवर फडणवीस समर्थक जाण्याची शक्यता असल्याची पक्षामध्ये चर्चा आहे. विश्वस्त म्हणून शहरातील एका स्थानिक आमदाराचा समावेश केला जात असताना त्यासाठी सुधाकरराव देशमुख आणि डॉ. मिलिंद माने यांच्या नावांची चर्चा आहे. देशमुख हे फडणवीस तर डॉ. माने गडकरी गटाचे असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे प्रन्यासमधील चार विश्वस्त पदे एकाचवेळी भरली जाण्याची शक्यता असल्यामुळे त्यावर कोणाची वर्णी लागते? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.या पदावर कोणाची नियुक्ती करायची यासाठी प्रथम गडकरी आणि फडणवीस यांच्यात एकमत होणे गरजेचे आहे. ते झाल्यावरच हा तिढा सुटण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gadkari fadanvis supporters in competition
First published on: 04-09-2015 at 00:13 IST