नागपूर : देशातील आणिबाणीचा काळ हा भारतीय लोकशाहीतील सर्वात संघर्षमय आणि निर्णायक टप्पा मानला जातो. मात्र या कालखंडाचे दस्तावेजीकरण अत्यल्प असल्याबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी खंत व्यक्त केली. “माझ्या दोन्ही मुलांना इमर्जन्सीबद्दल माहिती नाही; कारण त्या काळाविषयी आमच्याकडे कोणत्याही नोंदी उपलब्ध नाहीत,” असे सांगताना त्यांनी त्या कालखंडातील आपल्या स्वानुभवांची उजळणी केली आणि लोकशाही वाचविण्यासाठी केलेल्या संघर्षाची जाणीव उपस्थितांना करून दिली.

रेशीमबाग मैदानावर आयोजित नागपूर पुस्तक महोत्सव–२०२५च्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला उच्च व तांत्रिक शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, एनबीटी इंडिया अध्यक्ष प्रा. मिलिंद मराठे, प्रसिद्ध लेखक अमिश त्रिपाठी, तसेच झिरो माईल यूथ फाउंडेशनचे अध्यक्ष अजय संचेती उपस्थित होते.

गडकरी पुढे म्हणाले, त्या काळात जे काही घडत होते, त्याची नोंद ठेवण्याची आपल्या समाजात परंपरा नव्हती. इंग्रज दररोज डायरी लिहायचे; मात्र आपल्याकडे ही सवय क्वचितच होती. त्यामुळे आणिबाणीवरील तपशीलवार नोंदी आज उपलब्ध नाहीत. या विषयावर पुस्तकेही पुरेशा प्रमाणात तयार होऊ शकली नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले.

आणिबाणीच्या विरोधात उभ्या राहिलेल्या कार्यकर्त्यांचा संघर्ष स्मरता गडकरी म्हणाले की, जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात आंदोलन झाले. आम्ही रस्त्यावर उतरलो, लाठीमार सहन केला. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. मात्र त्या काळातील त्यागाचे पुरावे आज कुठेच दिसत नाहीत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

गडकरी यांनी या प्रसंगी समाजातील विचारशून्यतेवरही बोट ठेवले. आज विचारभिन्नता ही समस्या नाही; तर विचारशून्यता ही खरी समस्या आहे. लोक पुस्तक वाचत नाहीत, इतिहास अभ्यासत नाहीत. अनेकांना त्या काळाचा इतिहासही माहीत नाही. काही जण फक्त एखादा पक्ष सत्तेत आहे म्हणून त्यात प्रवेश करतात, पण त्यामागील विचारांची निष्ठा त्यांना माहीत नसते, अशी टीका त्यांनी केली.

लोकशाही टिकवण्यासाठी केलेल्या त्यागाचे मूल्य आगामी पिढ्यांना समजले पाहिजे, यावर भर देत गडकरी म्हणाले, त्या काळातील दिवस आजही डोळ्यांसमोर आहेत; पण नोंदी नसल्याने तो इतिहास पुढे पोहोचू शकला नाही. हा वारसा जतन करणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले. गडकरी यांनी डायरी लिहण्याची सवय, इतिहासिक नोंदी आणि पुस्तक स्वरुपातील दस्ताऐवजीकरण यांचे महत्व सांगण्याचे प्रयत्न केला. वाचन करणे म्हणजे मनोरंजन नव्हेतर ज्ञान शक्ती आहे, असेही ते म्हणाले.