नागपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा शहरात सम्राट लॉनच्या भल्या मोठ्या सभागृहात सुरू असलेल्या राज्यस्तरीय जुगार अड्ड्याबाबत ‘लोकसत्ता’ने वृत्तमालिका प्रकाशित केली होती. या वृत्तमालिकेची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घेतली. वरिष्ठांनी दिलेल्या आदेशानुसार राजुऱ्यातील जुगार अड्डा बंद झाल्याची माहिती समोर आली आहे.

आंध्रप्रदेश, तामिळनाडू आणि तेलंगणा राज्यात जुगारावर बंदी असल्याने या राज्यातील जुगार अड्डे संचालकांनी चंद्रपुरातील राजुऱ्यात जुगार अड्डा भरवला होता. सोमेश्वर ऐटलावर यांच्या मालकीच्या सम्राट लॉनची निवड करण्यात आली होती. आठवड्यातील शुक्रवार, शनिवार आणि रविवार अशी तीन दिवस सम्राट लॉनमध्ये रमी क्लबच्या नावावर जुगार अड्डा भरवून कोटींची उलाढाल सुरू होती. या सर्व जुगार अड्ड्यांना चंद्रपूर पोलिसांचा आशीर्वाद असून जुगार अड्डा चालकाने ठाणेदार, पोलीस उपविभागीय अधिकारी कार्यालय आणि पोलीस अधीक्षक कार्यालय, स्थानिक गुन्हे शाखा, विशेष पोलीस महानिरीक्षकांचे कार्यालयासह सत्तापक्षातील आमदार आणि विरोधी पक्षातील आमदारांसह काही राजकीय कार्यकर्त्यांनाही ‘अर्थपूर्ण’ संबंध जोपासून ‘सेट’ केले होते. वरपासून ते खालपर्यंत सर्वांशी अर्थपूर्ण संबंध ठेवल्यामुळे सम्राट लॉनमधील सभागृहात बिनधास्तपणे जुगार अड्डा सुरू होता. महाराष्ट्र पोलीस कारवाई करीत नसल्यामुळे शेवटी तेलंगणा पोलिसांना हस्तक्षेप करीत सम्राट लॉनवर छापा घालावा लागला होता. तरीही महाराष्ट्र पोलिसांच्या आशीर्वादाने तोच जुगार अड्डा पुन्हा सुरू झाला होता. जुगार अड्ड्यामुळे युवा पिढीसुद्धा जुगाराच्या नादी लागल्याने स्थानिक नागरिकांनी राजुऱ्याचे माजी आमदार संजय धोटे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांच्याकडे तक्रारी केल्या. ‘लोकसत्ता’ने जुगार अड्ड्याबाबत वृत्तमालिका प्रकाशित केली होती. त्यामुळे पोलीस प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार जुगार अड्डा बंद पाडल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Tesla chief, Elon Musk, electric car, investment, india
‘टेस्ला’कडून भारतात २ ते ३ अब्ज डॉलरची गुंतवणूक? एलॉन मस्क यांच्या दौऱ्यादरम्यान घोषणा होण्याचा अंदाज
Eknath Shindes Shiv Senas claim on Bhiwandi Lok Sabha
भिवंडी लोकसभेवर शिंदेच्या शिवसेनेचा दावा, कल्याणचे पडसाद भिवंडीत
clemen lobo arrested after 36 years in salim cassetwala murder case
वसईतील प्रसिध्द सलीम कॅसेटवाला हत्या प्रकरण; फरार आरोपी क्लेमेन लोबोला ३६ वर्षांनी अटक
death of Uttar Pradesh gangster Mukhtar Ansari
अन्सारीच्या मृत्यूची न्यायालयीन चौकशी, उपचारादरम्यान मृत्यू; तुरुंगात विषप्रयोग केल्याचा कुटुंबीयांचा आरोप

विदेशी मद्याची विशेष सोय

सम्राट लॉनमधील जुगार अड्ड्यावर तीन राज्यातील कोट्यधीश व्यापारी जुगार खेळायला येतात. त्यामुळे तीन दिवस राजुऱ्यातील सभागृहात विदेशी मद्य आणि रात्रभर डीजेवर गाणी सुरू असतात. महागड्या कारमधून मॉडेल असलेल्या तरुणींचीही रेलचेल राजुऱ्यात वाढली होती. त्यामुळे गावकऱ्यांनी या जुगार अड्ड्याला विरोध केला होता.

स्थानिक गुन्हे शाखेची विशेष कृपा

चंद्रपूर जिल्ह्यात सुरू असलेले अवैध व्यवसाय, दारू, वरली-मटका आणि अवैध धंद्यावर कारवाई करण्याची जबाबदारी स्थानिक गुन्हे शाखेची (एलसीबी) आहे. मात्र, ‘स्मार्ट’ असलेल्या एलसीबीचे सम्राट लॉनमधील जुगार अड्ड्याकडे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष होते. एलसीबीची कृपा असल्यामुळेच राजुऱ्यात कोणतीही कारवाई होत नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. याबाबत विचारणा करण्यासाठी राजुरा विभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी राजा पवार यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.