सीबीएसई दहावीतील विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळ

नागपूर : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या आज मंगळवारी जाहीर झालेल्या निकालामधून शहरातील काही सीबीएसई शाळांनी शुल्क न भरणाऱ्या विद्यार्थ्यांचा  सूड घेतल्याचे निदर्शनास आले आहे. इयत्ता नववीमध्ये ९० टक्क्यांहून अधिक गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दहावीमध्ये अंतर्गत मूल्यमापनात केवळ ७० टक्के गुण देण्यात आले आहे.

खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडून वसूल केल्या जाणाऱ्या वारेमाप शुल्काविरोधात पालक जागृत झाले असून दोन वर्षांपासून शुल्क कपातीची मागणी सुरू आहे. शिवाय करोनामुळे शाळा बंद असल्याने पायाभूत सुविधांवरील खर्च वाचत असल्याने शाळांनी शुल्कामध्ये कपात करावी अशीही मागणी होत आहे. त्यामुळे पालकांनी पूर्ण शुल्क न भरल्याने अनेक शाळांनी अशा विद्यार्थ्यांचे ऑनलाईन वर्ग बंद केले. काही शाळांनी शुल्क न भरणाऱ्यांचा शाळा सोडल्याचा दाखल घरी पाठवला. मात्र, यंदा परीक्षा रद्द झाल्याने याच शाळांना गुणदान करायचे होते. त्यामुळे या संधीचा फायदा घेत काही शाळांनी शुल्क न भरणाऱ्या विद्यार्थ्यांना कमी गुण दिल्याचा आरोप पालकांनी केला आहे. शाळांच्या या कृतीचा सर्वत्र निषेध होत आहे. मंगळवारी दुपारी इयत्ता दहावीचा निकाल जाहीर होताच अनेक विद्यार्थ्यांनी अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याची तक्रार केली. यावर पालकांनी शाळांमध्ये जाऊन यासंदर्भात चौकशी केली. तसेच मागील वर्षाच्या व सत्रांत परीक्षांच्या गुणपत्रिका तपासल्या. यामध्ये पाल्यांना २० पैकी १९ गुण असल्याचे दिसून आले. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना दहावीमध्येही ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळणे अपेक्षित असताना अशा विद्यार्थ्यांना शाळांनी ७० ते ७५ टक्क्यांपर्यंतच गुण दिले आहेत. त्यामुळे पालकांमध्ये प्रचंड नाराजी आहे.

आरोप काय?

हिंगणा परिसरातील एका पालकाने सांगितले, त्यांची मुलगी ही शहरातील एका नामवंत शाळेतील विद्यार्थिनी आहे. तिला इयत्ता नवव्या वर्गात ९३ टक्के गुण होते. दहावीचे संपूर्ण वर्ष तिने ऑनलाईन  शिक्षण घेतले. नियमित अभ्यासही केला. तिला ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळणे अपेक्षित होते. शिवाय तिला प्रत्येक परीक्षेमध्ये पैकीच्या पैकी गुण मिळाले होते. मात्र, शाळांनी ५० टक्के शुल्क माफ करावे अशी मागणी असल्यामुळे, तसेच शासनानेही शुल्क कमी करण्याचे आदेश दिल्यामुळे त्यांनी पूर्ण शुल्क भरले नाही. याचा परिणाम त्यांच्या मुलीच्या निकालामध्ये दिसून आला आहे. शाळेने तिला कमी गुण देत दहावीमध्ये केवळ ७३ टक्के गुण दिल्याचे या पालकाचे म्हणणे आहे. शुल्कासाठी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळण्याच्या या प्रकाराची शासनाने गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी केली जात आहे.