लोकसत्ता टीम
वर्धा: राज्यातील सर्व जिल्ह्यातून व देशातील वीस राज्यातील सर्वोदयी गांधीवादी १४, १५ व १६ मार्चला सेवाग्रामला एकत्र येत आहेत. सर्व सेवा संघाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्य होत असलेल्या या संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी माजी मंत्री सुनील केदार आहेत. तयारी अंतिम टप्प्यात असून दोन हजारावर प्रतिनिधींना सामावून घेणारा विशाल मंडप आकारास येत आहे. मंडपामुळे या संमेलनाची तुलना नुकत्याच होऊन गेलेल्या मराठी साहित्य समेलनाशी होत आहे. त्या संमेलनातील मुख्य मंडप विनोबांच्या नावे तर हा मुख्य सभामंडप सुद्धा विनोबा भावे सभागृह म्हणून ओळखले जाईल.
आणखी वाचा- वर्धा : महिलेकडून मोपेडमधून दारूची वाहतूक; सव्वा लाखाचा साठा पकडला
रेल्वे व बसस्थानकावर येणाऱ्या प्रतिनिधींना आणण्यासाठी वाहन व्यवस्था करण्यात येत आहे. निवास व भोजन व्यवस्था आश्रम परिसरातील विविध संस्थांत होत आहे. त्या संमेलनाशी तुलना अयोग्य आहे. विशाल परिवार एकत्र येत असल्याने तयारीची व्याप्ती वाढली. सर्व उपक्रम गांधींना अपेक्षित साधनसुचिता पाळूनच होणार असल्याचे आयोजन समितीतील अविनाश काकडे म्हणाले. संमेलनात माजी कुलगुरू डॉ. जनार्दन वाघमारे ( मराठवाडा ), डॉ अभय बंग, दिल्ली येथील राजघाट परिसरातील राष्ट्रीय गांधी संग्रहालयाच्या अध्यक्ष तारा गांधी, जलपुरुष डॉ. राजेंद्रसिंग, रामचंद्र राही दिल्ली, धीरूभाई मेहता व अन्य मान्यवरांची हजेरी लागणार आहे. संमेलनाचे अध्यक्ष म्हणून अमरनाथ भाई यांची निवड झाली असून उद्घाटन निर्वासित तिबेट सरकारचे माजी पंतप्रधान प्रा.समडोंग रिंपोछे यांच्या हस्ते होणार आहे.