माती, रंग, सजावटीच्या वस्तू महागल्या; मूर्तीकारांना मोठा फटका

श्रावणमासाला प्रारंभ होताच गणरायाच्या आगमनाचे वेध लागतात. शहरातील चितारओळीत मूर्ती बनविण्याची लगबग सुरू झाली आहे. मात्र, यंदा वस्तू व सेवा कर (जीएसटी) लागू झाल्याने माती व रंगासोबतच सजावटीच्या वस्तूंचे दर वाढले आहेत. त्यावर जवळपास २८ टक्के कर लागू झाल्याने याचा मोठा फटका मूर्तीकारांना बसणार आहे. मूर्तीच्या किंमतीत १५ टक्के वाढ होणार असून त्याची झळ मूर्तीकारांसह ग्राहकांना बसणार आहे.

Arvind Kejriwal Mango eating Controversy How Much Calories and Sugar Does One Mango has
केजरीवालांनी आंबा खाल्ल्याने वाद; डायबिटीक रुग्णांनी आंबा खाल्ल्याने काय होईल? १ वाटी आंब्यात काय दडलंय, बघा
printed receipts toxic body experts stop you must not touch those printed receipts heres why
खरेदीनंतर मिळणाऱ्या पावतीला स्पर्श करणे आरोग्यासाठी ठरतेय घातक? डॉक्टर काय सांगतात? वाचा
diy skin care prevent foot odour this summer expert tips on how to keep your feet fresh all day
उन्हाळ्यात घामामुळे पायांना दुर्गंधी येतेय? मग फॉलो करा डॉक्टरांनी सांगितलेले ‘हे’ सोपे उपाय
Rural Health Services pregnant woman from Nandurbar lost her life due to lack of timely medical care
ग्रामीण आरोग्य सेवा : ठसठसती जखम!

२५ ऑगस्टला लाडक्या बाप्पांचे आगमन होत आहेत. गणरायची सर्वात जुनी मूर्तीकारांची वस्ती म्हणून चितारओळ अख्ख्या विदर्भात प्रसिद्ध आहे. त्यामुळे आता येथे मूर्ती बनविण्याच्या कामाला वेग आला आहे. दरवर्षी येथून जवळपास दीड कोटी रुपयांची उलाढाल केवळ गणरायांच्या मूर्तीच्या माध्यमातून होते. मंडळांची गणेश मूर्ती असो किंवा घरी बसवण्यात येणारी लहान मूर्ती, नागपूरकर सर्वप्रथम चितार ओळीतील मूर्तीलाच प्राधान्य देतात. मात्र, यंदा हीच चितार ओळ नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे पीओपी मूर्तीना मिळणारी बगल आणि नव्याने लागू झालेला जीएसटी. गणपती मूर्ती बनविण्यासाठी माती आणि रंग या दोन्ही मूलभूत गोष्टी असल्याने मूर्तीकारांना जीएसटीचा मोठा फटका बसणार आहे. कच्च्या साहित्याच्या किमतीमध्ये वाढ झाल्याने गणेशमूर्तीच्या किमतीतही वाढ होणार आहे. मातीच्या एक फुटाच्या मूर्तीची किंमत साधारणपणे ३ हजार रुपये इतकी असते, परंतु आता यावेळी जीएसटीमुळे तिच्या किमतीत ५०० रुपयांनी वाढ होण्याची शक्यता आहे, तर प्लास्टर ऑफ पॅरिसच्या एक फुटाच्या मूर्तीची किंमत १ हजार रुपये इतकी असते यामध्येही ७०० रुपयांची वाढ होणार आहे. मूर्तीकारांना कारागिरांचे वेतन देणेही यामुळे परवडणारे नाही. कारागीरांचे वेतन हे २५ ते ३० हजार रुपयांच्या घरात आहेत. त्यांना वेतन देताना मूर्तीकारांना मोठय़ा प्रमाणात गुंतवणूक करावी लागणार आहे. मात्र, बँकांकडून कर्ज मिळणेही कठीण असल्याने मूर्तीकारांना यंदा आíथक तोटा सहन करावा लागणार आहे. केंद्र सरकारने घेतलेला जीएसटीचा निर्णय योग्य आहेच, पण गणेशमूर्तीसाठी लागणाऱ्या कच्च्या साहित्याला जीएसटीतून वगळावे, अशी मागणी आहे. गणेशमूर्तीच्या व्यवसायामध्ये लाखो लोक गुंतलेले आहेत. त्यामुळे त्यांच्या आíथक स्रोतावरही जीएसटीचा परिणाम होणार आहे. गणपतीच्या मूर्तीची किंमत वाढल्याने त्याचा फटका मंडळांना बसणार आहे. मूर्तीच्या किमती नक्षीकामावर अवलंबून असतात. नक्षीकाम उत्तम असेल तर एक फुटाची मूर्तीही १५ हजारांच्या घरात जाते. शाडू, प्लास्टर ऑफ पॅरिस, प्लास्टिक पेंट, वॉटर पेंट, काथ्या यांच्या किमतीत ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

सजावटीचे साहित्यही महागले

सध्या मूर्तीच्या सजावटीसाठी लागणाऱ्या वस्तूंचा व्यवसाय ठप्प पडला आहे. कापडावर जीएसटी लागू झाल्याने मूर्तीसाठी लागणारे वस्त्र महागले आहे. अशात अजूनही मूर्तीकारांनी वस्त्राची खरेदी केलेली नसून बाजारात शुकशुकाट आहे. तसेच सजावटीचे साहित्य देखील महाग झाले आहे. हार, माळ, मुकुट, वस्त्रासाठी लागणारे कापड, दागिने, खडे यावर किती जीएसटी लागू झाला व तो किती आकारावा, याबद्दल संभ्रम कायम आहे. आपल्याकडे मथुरा येथून वस्त्राचे कापड व वस्त्रे येत असून यंदा खरेदी झालेली नाही. गेल्या पाच वर्षांपासून या व्यवसायात आहे, मात्र यंदा कमालीची मंदी आहे.

– गणेश देशमुख, सजावट वस्तूंचे विक्रेते चितार ओळ

जीएसटीमुळे व्यवसाय थंडावला 

पीओपीच्या मूर्ती यंदाही बाजारात उपलब्ध आहेत. नागपूर महापालिका या विषयाकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करत असल्याने आमच्या पिढीजात व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. शंभर वर्षे जुन्या चितार ओळीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. येथील मूर्तीकार शंभर टक्के मातीच्या मूर्ती तयार करतात व एका मूर्तीसाठी किमान १० दिवसांचा कालावधी लागतो. मात्र, पीओपीचा साचा तयार असून ते एका दिवसात दहा मूर्ती तयार करतात अन् त्याची सर्रास विक्री करतात. यंदा जीएसटीने आधीच अडचणीत असलेल्या आमच्या व्यवसायात भर घातली आहे. माती आणि रंगावर जीएसटी लागू झाल्याने मूर्तीचा व्यवसाय थंडावला आहे. आपल्याकडे भंडारा येथील आंधळगावच्या मातीने मूर्तीची निर्मिती होते. मात्र, एका ट्रॉलीमागे आता ३ हजार रुपये वाढल्याने यंदा मूर्ती महागणार आहेत. तसेच रंगावरही १२ टक्के जादा कर लावल्याने मूर्तीच्या किमतीत भर पडली आहे. आता केवळ ठराविक मंडळाच्या मूर्ती बनविण्याचे काम सुरू असून हा व्यवसाय पूर्वीप्रमाणे राहिलेला नाही. याशिवाय कारागिरांच्या मजुरीतही वाढ झाली आहे.

– सचिन गायकवाड, मूर्तीकार चितार ओळ

पीओपीमुळे मूळ मूर्तीकार अडचणीत 

आज ग्राहकांना स्वस्तात मूर्ती हवी आहे. मंडळांना देखील भल्या मोठय़ा मूर्ती हव्या आहेत. माती आणि रंगावर आता जीएसटी लागला आहे. आम्ही तयार करत असलेल्या मातीच्या मूर्ती पीओपीपेक्षा महाग असल्याने आमचा व्यवसाय धोक्यात आला आहे. मातीच्या मूर्ती कारागिरांच्या मदतीने कराव्या लागतात. मात्र, पीओपीच्या मूर्ती थेट साच्यात टाकून होत असल्याने त्या स्वस्तात अणि झटपट होतात. पीओपीवर देखील जीएसटी लागू झाल्याने यंदा त्या देखील महाग आहेत. शासन व प्रशासनाकडून पीओपी विक्रीवर बंदी घालण्याचे सोंग केले जात आहे. पीओपीमुळे मूळ चितार ओळीतील पारंपरिक मूर्तीकार अडचणीत सापडले आहेत. आता पीओपीवर प्रतिबंध घालणे आवश्यक आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने पीओपी घातक आहे. तसेच लोकांमध्येही जागरूकता कमी असल्याचे दिसून येते. या व्यवसायात आमची चौथी पिढी असून पुढील काळ कठीण आहे. जीएसटी लागू झाल्याने अडचणीत भर पडली आहे.

– प्रीतम सूर्यवंशी, मूर्तीकार चितार ओळ