नागपूर : गुन्हेगारांना न्यायालयातून जामीन मिळवून देण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार करणारी टोळी गुन्हे शाखेने जेरबंद केली आहे. या टोळीने बनावट दस्तावेज तयार करून न्यायालयातून जामीन मिळवण्यासाठी आतापर्यंत शेकडो गुन्हेगारांना मदत करून न्यायव्यवस्थेची फसवणूक केली. सुनील मनोहर सोनकुसरे (४५ रा. वर्धमाननगर) आणि सतीश रामकुमार शाहू (३२, देशपांडे लेआऊट, वर्धमाननगर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. रवी सावरकर आणि आरती शाहू (मिनीमातानगर) हे दोघे फरार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील सोनकुसरे आणि सतीश शाहू गेल्या सहा वर्षांपासून जिल्हा व सत्र न्यायालयाच्या समोर एका टाटा सुमो वाहनात बसून बनावट दस्तावेज तयार करून देत होते. न्यायालयाकडून जामीन मिळवण्यासाठी गुन्हेगारांना सालवंशी बनवून देण्यासाठी कोणीही आपले दस्तावेज देत नाही. त्यामुळे गुन्हेगार कारागृहात डांबले जातात. सुनील आणि सतीश या दोघांनी बनावट आधारकार्ड, सालवंशी, महापालिकेची करपावती, रेशन कार्ड, बनावट शिक्के, रबरी शिक्के, महापालिकेची कोणतीही कागदपत्रे तयार करून देण्याचा बेकायदेशीर व्यवसाय सुरू केला. या टोळीने रवी सावरकर आणि शाहू ऑनलाईन केंद्राची संचालिका आरती शाहू यांना आपल्या टोळीत सामिल करून घेतले.

गुन्हेगारांना न्यायालयातून जामिनासाठी लागणारी कागदपत्रे ही टोळी १० हजार रुपयांत तयार करून देत होती. या टोळीवर सीताबर्डी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे. टोळीकडून २५० बनावट आधारकार्ड, १०६ बनावट रेशन कार्ड, एक हजार पासपोर्ट फोटो, लॅपटॉप, प्रिंटर, झेरॉक्स मशीन हे साहित्य जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक किशोर पर्वते, सहनिरीक्षक गणेश पवार, संतोश मदनकर, सचिन आंधळे, प्रवीण चव्हाण यांनी केली.

न्यायव्यवस्थेची फसवणूक

जामिनासाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे तयार करून देण्यात ही टोळी पटाईत होती. कोणालाही संशय येणार नाही, अशी बनावट कागदपत्रे येथे तयारी केली जात होती. यामुळे न्यायालयसुद्धा ही कागदपत्रे ग्राहय धरत होते. या टोळीने पैसे कमावण्यासाठी न्यायव्यवस्थेची फसवणूक केल्याचे बोलले जात आहे.

सुनील सोनकुसरे टोळीचा सूत्रधार

सुनील सोनकुसरे हा बनावट दस्तावेज तयार करणाऱ्या टोळीचा मुख्य सूत्रधार असून तो पूर्वी एका वकिलाच्या हाताखाली अटर्नी म्हणून काम करायचा. यामुळे त्याला जामिनासाठी लागणारी कागदपत्रे आणि न्यायालयीन प्रक्रियेची माहिती होती. त्याने टोळी बनवून बनावट कागदपत्रांचा बेकायदेशीर व्यवसाय सुरू केला.

८ दिवसांपासून पाळत

पोलीस आयुक्तांनी पथकाला सापळा रचण्याचे आदेश दिले. पोलिसांनी जिल्हा न्यायालयासमोर सापळा रचला. मात्र आरोपी गवसत नव्हते. सलग आठ दिवस पाळत ठेवल्यानंतर ही टोळी सापडली. यातील आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gang arrested making fake court documents begins front district court ysh
First published on: 03-06-2022 at 00:02 IST