नागपूर : शहरातील हिंगणामधील भोसलेवाडी परिसरातील मध्यमवर्गीय कुटुंबातील गौरव पांडुरंग इंगळे याची स्वयंचलित वाहनाच्याबाबत असलेल्या संशोधन चमूत निवड झाली आहे. लंडनमधील प्रतिष्ठित युनिव्हर्सिटी ऑफ वारविकच्या ‘सेफ ऑटोनॉमी रिसर्च ग्रुप’मध्ये ‘रोबोटिक ऑटोमॅटिक वाहन’ प्रकल्पावर प्रकल्प अभियंता म्हणून गौरवची नियुक्ती झाली. यासाठी तो अलिकडेच लंडनला रवाना झाला आहे. गौरव भविष्यातील स्वयंचलित वाहतूकीसाठी अत्यावश्यक असणाऱ्या तंत्रज्ञानावर संशोधन करणार आहे.
काय असणार संशोधनात?
एम.एस्सी. (मेकाट्रॉनिक्स) पदवी शिक्षण जर्मनीच्या विद्यापीठातून त्याने पूर्ण केले. रोबोटिक्स, ऑटोमेशन आणि नियंत्रण प्रणाली या क्षेत्रांत त्याने सखोल संशोधन केले आहे. स्वयंचलित वाहनचालन प्रणालीतील सुरक्षितता पडताळणी (सेफ्टी व्हॅलिडेशन) क्षेत्रात विशेष रूची असलेल्या गौरवची निवड यूके रिसर्च अॅण्ड इनोव्हेशन या सरकारी संस्थेने वित्त पुरवठा केलेल्या प्रकल्पासाठी केली आहे. सेफ ऑटोनॉमी रिसर्च ग्रुपचे प्रमुख प्रा. डॉ. सिद्धार्थ खास्तगीर यांच्या मार्गदर्शनाखाली गौरव कार्यरत राहणार आहे. या प्रकल्पात मानवी वर्तनाचे अचूक मॉडेल तयार करणे, तसेच स्वयंचलित वाहनांची आभासी (व्हर्च्युअल) चाचणी करून त्यांची सुरक्षितता पडताळली जाणार आहे. सद्यस्थितीत सिम्युलेशनमधील वाहतूक सहभागींच्या प्रतिक्रियांची वास्तविकतेशी फारकत असल्यामुळे या संशोधनाचे महत्व अधिक वाढते. गौरव इंगळेच्या या यशामुळे हिंगणा परिसरातील तरुणांमध्ये उच्च शिक्षण व तंत्रज्ञान क्षेत्रात करिअर घडविण्यात नवचैतन्य निर्माण झाले आहे. ग्रामीण भागातील युवकही जागतिक स्तरावर आपले कौशल्य सिद्ध करू शकतात, हे गौरवने निर्विवाद सिद्ध करून दाखवले आहे.
स्वयंचलित वाहतूकीची गरज
यूकेसह अनेक देशांमध्ये स्वयंचलित वाहतुकीची गरज दिवसेंदिवस वाढत आहे. हे प्रकल्प अशा प्रगत प्रणालींना सुरक्षित बनवण्यास व त्यांच्या प्रतिक्रिया आणि क्रिया पडताळण्यास फार उपयुक्त ठरतील. त्याचबरोबर स्वयंचलित वाहनातील त्रुटी शोधून ते वाहने निर्धोकपणे कसे रस्त्यावर चालतील याची दक्षता घेतली जात आहे, अशी प्रतिक्रिया गौरव इंगळेने दिली. हिंगणा येथे शिवसेनेचे नगरसेवक व माजी तालुकाप्रमुख विष्णू कोल्हे यांनी इंगळे कुटुंबाच्या घरी जाऊन गौरवचा सन्मान केला. कोल्हे म्हणाले, गौरव इंगळे हा आपल्या गावपरंपरेचा आणि महाराष्ट्राचा जागतिक पटलावर मान वाढवणारा युवक आहे. भविष्यातील संशोधनविश्वात तो अधिक उज्ज्वल कामगिरी करेल, याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र कोल्हे आणि स्थानिक शिवसैनिकांनीही गौरवचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.