नागपूर रेल्वे स्थानकावर जिलेटीनच्या तब्बल ५४ कांड्या सापडल्या आहेत. नागपूर रेल्वे स्टेशनच्या गेटच्या बाजुला वाहतुक पोलिसांची एक चौकी आहे. या चौकीच्या मागच्या बाजुला एक बेवासर बॅग आढळून आली. या बॅगेची तपासणी केली असता त्यामध्ये तब्बल ५४ जिलेटीनच्या कांड्या असल्याची धक्कादायक माहीती समोर आली. या जिलेटीनच्या कांड्या वाहतूक पोलिस चौकीच्या मागच्या बाजूस सापडल्यामुळे पुन्हा एकदा नागपूर रेल्वे स्थानक परिसराच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

या परिसरात एक बेवारस बॅग आढळून आल्याची माहीती नागपूर रेल्वे पोलिसांना मिळाली. ही माहीती मिळताच नागपूर रेल्वे पोलिसांनी त्वरीत घटनास्थळी धाव घेतली. त्या बेवारस बॅगेची तपासणी केली असाता त्या बॅगेत जिलेटीनच्या कांड्या असल्याचं नागपूर रेल्वे पोलिसांच्या लक्षात आलं. नागपूर पोलिसांनी या सर्व ५४ जिलेटीनच्या कांड्या बॉंब शोधक पथकाच्या ताब्यात दिल्या आहेत. बॉंब शोधक पथकानं या कांड्या नागपूर पोलिस मुख्यालयाकडे नेल्या असुन त्या निकामी करण्यात येणार आहेत.

योग्यवेळी हा स्फोटकांचा साठा निदर्शनास आल्यामुळे संभाव्य धोका टळला. या जिलेटिनच्या कांड्या इथे आल्या कश्या आणि त्या कोणी आणल्या याचा तपास नागपूर पोलिस करत आहेत. या भागातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासण्य़ात येणार आहे. नागपूर रेल्वे स्थानकासारख्या गजबजलेल्या ठिकाणी वाहतूक पोलिसांच्या चौकीच्या बाजुलाच अशी स्पटोकं सापडल्यामुळे या परिसराच्या सुरक्षेबाबत मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.