नागपूर : दिवसातील अनेक तास मोबाईलवर घालविण्याची सवय असलेल्या जेन झी पिढीसह इतरही वयोगटात सध्या मान, खांदे आणि मणक्यांच्या विकारांचे प्रमाण झपाट्याने वाढत असल्याचा नागपुरातील इशारा इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या अस्थिरोग विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. मोहम्मद फैजल यांनी दिला आहे. सतत खाली मान घालून मोबाईलकडे पाहणे, चुकीच्या बैठकीच्या सवयी आणि शारीरिक हालचालींचा अभाव यामुळे पूर्वी प्रामुख्याने वाढत्या वयात दिसणाऱ्या या समस्या आता विद्यार्थी आणि तरुण नोकरदारांमध्येही मोठ्या प्रमाणावर आढळत असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रा. डॉ. मोहम्मद फैजल यांच्या मते, मोबाईल वापरताना बहुतांश जण मान पुढे झुकवून दीर्घकाळ पडद्याकडे पाहतात. त्यामुळे मानेवर, खांद्यांवर आणि मणक्यावर अतिरिक्त ताण येतो. ही स्थिती दिवसातून अनेक तास कायम राहिल्यास स्नायू, सांधे आणि मणक्यांवर त्याचा गंभीर परिणाम होऊ लागतो. जेन झी पिढीसह इतरही वयोगटातील नागरिकांमध्ये मानदुखी, खांदेदुखी, पाठदुखी, डोकेदुखी, हातांना मुंग्या येणे, मानेची हालचाल कमी होणे, स्नायू आखडणे आणि मणक्यांचे विविध विकार वाढत असल्याचे प्रा. डॉ. फैजल यांनी सांगितले. काही रुग्णांमध्ये मज्जातंतूंवर दाब आल्याने वेदना हातापर्यंत पोहोचतात.

कोणाला सर्वाधिक धोका आहे?

महाविद्यालयीन विद्यार्थी, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कर्मचारी, कार्यालयीन काम करणारे, घरून काम करणारे कर्मचारी आणि दिवसातील अनेक तास मोबाईलवर सामाजिक माध्यमे, चित्रफिती किंवा खेळ पाहणाऱ्या तरुणांना या समस्यांचा सर्वाधिक धोका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

चुकीच्या सवयी किती कारणीभूत आहेत?

पलंगावर आडवे होऊन मोबाईल वापरणे, उशीला मान टेकवून दीर्घकाळ पडद्याकडे पाहणे, वाकून बसणे किंवा चालताना मोबाईल वापरणे या सवयी मणक्यावर अनावश्यक ताण निर्माण करतात. दीर्घकाळ या सवयी कायम राहिल्यास त्रास अधिक वाढतो, असे प्रा. डॉ. फैजल यांनी सांगितले.

कोणती लक्षणे दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा?

मान सतत दुखणे, खांद्यात वेदना जाणवणे, हातात मुंग्या येणे, डोकेदुखी वाढणे, मानेची हालचाल कमी होणे, हातात अशक्तपणा जाणवणे किंवा वेदना हातापर्यंत पसरू लागल्यास त्वरित अस्थिरोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असे त्यांनी सांगितले.

या समस्यांपासून बचाव कसा करता येईल?

मोबाईल डोळ्यांच्या उंचीवर धरावा, सलग दीर्घकाळ वापर टाळावा, दर २० ते ३० मिनिटांनी थोडा विराम घ्यावा, मान आणि खांद्यांचे नियमित व्यायाम करावेत, योग्य पद्धतीने बसावे आणि रोज काही वेळ शारीरिक हालचालींसाठी द्यावा. झोपण्यापूर्वी मोबाईलचा वापर कमी ठेवणेही आवश्यक असल्याचे प्रा. डॉ. मोहम्मद फैजल यांनी सांगितले.

दुर्लक्ष केल्यास काय होऊ शकते?

सुरुवातीला किरकोळ वाटणारा त्रास पुढे कायमस्वरूपी मानदुखी, मणक्यांचे विकार, मज्जातंतूंवर दाब, हाताची ताकद कमी होणे आणि दैनंदिन कामांमध्ये अडथळे निर्माण होण्याचे कारण ठरू शकतो. त्यामुळे विशेषतः जेन झी पिढीने मोबाईलचा वापर मर्यादित ठेवून योग्य जीवनशैली स्वीकारणे आवश्यक असल्याचा सल्ला प्रा. डॉ. मोहम्मद फैजल यांनी दिला आहे.

मानेला नेमके काय होते?

प्रा. डॉ. मोहम्मद फैजल यांच्या माहितीनुसार, सतत मान खाली झुकवून मोबाईल वापरल्याने मानेच्या मणक्यांवर अतिरिक्त ताण येतो. यामुळे स्नायू, सांधे आणि मज्जातंतूंवर परिणाम होऊन पुढे मानेचे विकार, चकती सरकणे आणि हातापर्यंत वेदना जाण्याची समस्या निर्माण होऊ शकते.

डॉक्टरांचा सल्ला काय ?

मानदुखी सुरू झाल्यानंतर उपचार घेण्यापेक्षा ती होऊच नये यासाठी मोबाईलचा वापर नियंत्रित ठेवणे, योग्य बैठक ठेवणे आणि नियमित व्यायाम करणे अधिक महत्त्वाचे आहे. विशेषतः जेन झीने या सवयी लवकर आत्मसात करणे गरजेचे आहे, अशी माहिती मेयो रुग्णालयातील अस्थिरोग विभाग प्रमुख डाॅ. फैजल यांनी सांगितले.

कोणती काळजी घ्यावी? पाच महत्त्वाच्या सवयी

  • सलग ३० ते ४० मिनिटांपेक्षा जास्त वेळ मोबाईलकडे पाहू नये.
  • मोबाईल डोळ्यांच्या उंचीवर धरून वापरावा.
  • दर अर्ध्या तासाने मान, खांदे आणि पाठ यांचे हलके व्यायाम करावेत.
  • झोपताना उशीवर मान वाकवून मोबाईल पाहणे टाळावे.
  • नियमित शारीरिक हालचाल आणि व्यायाम करावा.