* जिल्हा प्रशासनाचे डॉ. प्रमोद साळवेंना अभय * अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा आरोप

गडचिरोली जिल्ह्य़ातील धानोराच्या साळवे नर्सिग कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या बऱ्याच विद्यार्थिनींचे शारीरिक व मानसिक शोषण संस्थापक डॉ. प्रमोद साळवेंकडून होत आहे. ही तक्रार जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, आरोग्य विद्यापीठाच्या कुलगुरूंसह वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांना केल्यावरही काहीच झाले नाही. आरोपीला जिल्हा प्रशासनाचे अभय असून तातडीने डॉ. साळवेंवर कारवाई न झाल्यास अखिल भारतीय विद्यार्थी परिषद तीव्र आंदोलन करेल, असा इशारा विद्यार्थी परिषदेचे रवी रमेशराव दांडगे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिला.

साळवे नर्सिग कॉलेजकडून शासनाच्या सगळ्या नियमांची पायामल्ली होत असून येथे पायाभुत सुविधाही नाही. विद्यार्थिनींच्या वसतिगृहाकरिता महिला वार्डनही नसून संस्थापक डॉ. साळवे केव्हाही विद्यार्थिनींच्या खोलीत जावून त्यांचा विनयभंग करण्यासह त्यांच्याशी गैरवर्तन करतो. ही माहिती विद्यार्थिनींकडून त्यांच्या पालकांना कळू नये म्हणूण विद्यार्थिनींच्या मोबाईल वापरासह त्यांना घरी जाण्यावरही प्रतिबंध आहे. डॉ. साळवे विद्यार्थिनींकडून खासगी कामे जबरन करून घेत असून विद्यार्थिनींकडून शिक्षण शुल्क घेतल्यावर त्यांच्या शिष्यवृत्तीबाबत विविध कोऱ्या कागदांवर सह्य़ा घेतल्या जातात. संस्थेच्या मालकीचे स्वत:चे रुग्णालयही नसून ते विद्यापीठाची समिती निरीक्षणाकरिता आल्यास कृत्रीमरित्या दाखवल्या जाते.

कॉलेजचे सगळेच २०० विद्यार्थी या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळल्याने त्यांनी गडचिरोलीचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, वैद्यकीय संचालक, वैद्यकीय शिक्षणमंत्री, महाराष्ट्र आरोग्य विद्यान विद्यापीठाचे कुलगुरूंसह अनेकांना तक्रारी करत निवेदन सादर केले. परंतु काहीच झाले नाही. या कॉलेजच्या काही विद्यार्थिनींना डॉ. साळवेंनी जातीवाचक शिवीगाळ केल्यामुळे मुलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला. परंतु अद्याप डॉ. साळवेंना अटकही झाली नाही. आरोग्य विद्यापीठाच्या कुलगुरूंनी त्यांच्या अखत्यारित असलेल्या बीएससी नर्सिगच्या सुमारे ३२ विद्यार्थिनींना नागपूरच्या विविध संस्थेत दोन महिने शिक्षणाची परवानगी दिली असली तरी इतर विद्यार्थ्यांची कोंडी कायम आहे.

त्यातच आरोग्य विद्यापीठाच्या समितीने डॉ. साळवेंना क्लिनचिट दिली आहे. यातही काही व्यवहार झाला असावा, असाही आरोप त्यांनी केला. तातडीने येथील विद्यार्थ्यांना इतर संस्थांमध्ये शिक्षणासाठी सामावून या संस्थेवर कारवाई करीत डॉ. साळवेंना शिक्षा करावी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा रवी दांडगे यांनी दिला.