नागपूर : आठव्या वर्गात नापास झाल्यामुळे पालकांच्या भीतीपोटी मुलीने थेट घरातून पलायन केले. नातेवाईकाच्या घरी जाण्यासाठी निघालेली मुलगी एका युवकाच्या प्रेमात पडली. अवघ्या १५ व्या वर्षी तिचे लग्न झाले आणि आठ वर्षांनंतर तिचा पोलिसांनी शोध घेतला. त्यावेळी ती मुलगी ३ मुलांची आई होती. मात्र, घरातून निघून गेलेली एकुलती मुलगी पालकांना दिसताच त्यांनी तिचा स्वीकार केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाडी परिसरातील एका फर्निचर व्यावसायिकाला टीना (काल्पनिक नाव) एकुलती मुलगी होती. ती आठव्या वर्गात नापास झाली. घरी गेल्यानंतर तापट स्वभावाचे वडिल मारतील किंवा ओरडतील, अशी भीतीपोटी तिने थेट घरातून पळून जाण्याचा निर्णय घेतला. बिहारला जाणाऱ्या रेल्वेत बसून मुलगी निघून गेली. मुलगी अचानक बेपत्ता झाल्यामुळे पालकांनी वाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तिचा आठ वर्षे कोणताही शोध लागला नाही. त्यामुळे पालकांच्या चिंतेत भर पडली. एकुलती मुलगी जिवंत आहे किंवा नाही, याबाबतही संशय त्यांना होता. शेवटी हे प्रकरण मानवी तस्करी विरोधी पथकच्या (एएचटीयू) रेखा संकपाळ यांच्याकडे आले. मुलगी बेपत्ता असल्याबाबत कोणताही सुगावा नसताना सलग ३ महिने परीश्रम घेतले. अखेर मुलीच्या अपहरणाचा तपासाचा धागा सापडला. मुलगी जिवंत असल्याचे निरोप तिच्या आईवडिलांना दिला.
नेमके काय झाले ?
टीना ही रेल्वेने बिहारला गेली. ती पटण्याला उतरली. तेथे तिला राजस्थानचा मुकेश नावाचा युवक भेटला. ती एकटी असल्याचे लक्षात येताच त्याने तिला घरी नेले. १५ वर्षाच्या टिनाला त्याने लग्नासाठी तयार केले. दोघांनी अवघ्या १५ दिवसांत लग्न केले. पती-पत्नी म्हणून संसार सुरू केला. त्यांनी तीन मुली झाल्या. तो एका कंपनीत रोजंदारीवर कामगार आहे. तर टीना तीन मुलांचा सांभाळ करून शेतीच्या कामाला जाते.
असे घेतले ताब्यात
गुन्हे शाखेला तपासाचा धागा सापडताच त्यांनी राजस्थानला पथक पाठवले. मुकेशच्या घरातून टीनाला ताब्यात घेतले. नागपुरात आल्यानंतर तिला पालकांच्या स्वाधीन केले. मुलगी परत मिळाल्याचा पालकांना खूप आनंद झाला. मात्र, आठव्या वर्गातील टिना आता तीन मुलींसह परत आली. तिच्या पालकांनी पोलिसांचे आभार मानले. ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, उपायुक्त मुमक्का सुदर्शन यांच्या मार्गदर्शनात सहायक निरीक्षक रेखा संकपाळ, समाधान बजबळकर, लक्ष्मीछाया तांबुसकर, ज्ञानेश्वर ढोके, राजेंद्र अटकाळे, मनिष पराये आणि ऋषीकेश डुंबरे यांनी केली.