नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला एक गौरवशाली इतिहास लाभला आहे. मात्र, यातील सर्वात मोठा गुणधर्म म्हणजे विद्यापीठात काम करताना पक्ष आणि संघटनांमध्ये कितीही वैचारिक मतभेद असले तरी विद्यार्थी हित आणि विकासासाठी आम्ही एकत्र यायचो. संघटनांचा वेगळेपणा हा केवळ निवडणुकांपुरता असायचा. त्यामुळे पक्षीय आणि संघटनात्मक हितापेक्षा विद्यार्थी हिताला अधिक महत्त्व देणारा गौरवशाली इतिहास या विद्यापीठामध्येच पाहायला मिळतो, असे मत नागपूर विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणांमध्ये अनेक वर्षांच्या कामाचा अनुभव असलेले प्रभू देशपांडे यांनी व्यक्त केले.

हेही वाचा : विद्यापीठाचा अजब प्रकार; ऐन पोळ्याच्या दिवशी ठेवली परीक्षा

‘लोकसत्ता’ कार्यालयाला सदिच्छा भेट दिली असता विद्यापीठाच्या शतकोत्तर महोत्सवानिमित्ताने देशपांडे यांनी अनेक आठवणींना उजाळा दिला. ते विद्यापीठ शिक्षण मंचाचे अनेक वर्षे अध्यक्ष होते. तर सध्या अखिल भारतीय शैक्षणिक महासंघामध्ये ज्येष्ठ सदस्य म्हणून कार्यरत आहेत. नागपूर विद्यापीठाच्या सर्वच प्राधिकरणांमध्ये त्यांनी अनेक वर्षे काम केले आहे. देशपांडे म्हणाले, माजी कुलगुरू हरिभाऊ केदार, अटलबहादूर सिंग, दत्ताजी डिडोळकर अशा अनेक लोकांसोबत विद्यापीठामध्ये काम करण्याची संधी मिळाली. आम्हा सर्वांच्या संघटनांची वैचारिक भूमिका वेगळी होती. मात्र, आमच्यातील मतभेद हे केवळ निवडणुकांपुरते मर्यादित होते. निवडणुका संपल्या की विद्यापीठाच्या हितासाठी आम्ही सर्वांनी एकत्र मिळून काम कले आहे. विद्यापीठामध्ये कुठल्याही संघटनांचे मोर्चे आले की माजी कुलगुरू डॉ. सातपुते हे आवर्जून बोलावून घ्यायचे. त्यामुळे विद्यापीठाच्या शतकोत्तर वर्षात आठवणींना उजाळा देताना संघटनेपेक्षाही विद्यापीठ आणि विद्यार्थ्यांच्या हिताला महत्त्व देण्याचा गुणधर्म भविष्यातही जपला जावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

हेही वाचा : चंद्रपूर : देशांच्या राजधान्या तोंडपाठ; आता वैदिशाची संगीत क्षेत्रातही जादू; अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाची संगीत परीक्षा उत्तीर्ण

विद्यापीठाला स्वच्छ आणि विद्वान कुलगुरूंची परंपरा आहे. सर्वसमावेश विचार करणारे कुलगुरू या विद्यापीठाला मिळाले. सध्याचे कुलगुरूही सर्वांगीण आणि सर्वांचा विचार करणारे आहेत ही आपली जमेची बाजू असल्याचे ते म्हणाले. नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा पद्धतीमध्ये अनेक उणिवा होत्या. आधी उत्तरपत्रिका घरी तपासण्यासाठी दिल्या जात होत्या. त्यामुळे काही गैरप्रकार समोर आले होते. यावर विद्यापीठाने परीक्षा पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल केला. थेट परीक्षा विभागामध्ये उत्तरपत्रिका तपासण्याचे केंद्र तयार करणारे पहिले विद्यापीठ आहे. डॉ. पाराशर प्र-कुलगुरू असतानाही अनेक सुधारणा झाल्या असून परीक्षा पद्धतीमधील बदल आणि वेळेत निकाल देणारे नागपूर विद्यापीठ एकमेव आहे, असेही देशपांडे म्हणाले.

नागपूर विद्यापीठाने देशाला अनेक नामवंत चेहरे दिले आहेत. डॉ. श्रीकांत जिचकार, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस हे याच विद्यापीठ घडलेले आहेत. विद्यापीठाच्या संस्कारक्षम शिक्षणामुळेच असे नामवंत नेते घडल्याचे देशपांडे म्हणाले. विद्यापीठाला बलराज अहिर यांच्यासारख्या प्रभावशाली अधिकाऱ्यांचा इतिहास आहे. विद्यापीठाच्या शंभर वर्षांच्या यशस्वी वाटचालीमध्ये असे अधिकारी, कुलगुरू, कर्मचारी आणि संघटनांचा मोठा वाटा असल्याचेही ते म्हणाले.