नागपूर : कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाच्या संचालक निवडीवरून वाद सुरू झाले आहे. दोन्ही पक्षाकडे अध्यक्षांच्या निवडीसाठी पुरेसे संख्याबळ नाही. निवडणुकीत कॉंग्रेसचे सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीला २५ पैकी १३ जागा मिळाल्या होत्या तर महायुतीला १२ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे अध्यक्षांच्या निवडीचा पेच निर्माण झाला आहे. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.

‘तर पुन्हा निवडणूक घ्यावी लागली असती’

राज्य सरकारने गोकूळमध्ये चार संचालक नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावरून काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्यासह विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही ट्विट करून भाजपवर टीका केला. निवडून येता येत नाही म्हणून आडमार्गाने गोकूळ बळकावण्याचा हा डाव आहे, असा आरोप विरोधकांनी केला आहे. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात पत्रकारांशी अनौपचारिक चर्चेदरम्यान ‘गोकुळ’वर संचालक नेमले नसते तर पुन्हा निवडणूक घ्यावी लागली असती, असे सांगितले. १३ जागा जिंकूनही कोरम पूर्ण होत नाही. त्यामुळे चेअरमन निवडता येत नाही. चेअरमन निवडण्यासाठी किमान १४ सदस्यांची गरज आहे. त्यामुळे कायदेशीर पेचप्रसंग निर्माण झाला आहे. अध्यक्ष निवडीसाठी एक बैठक झाली. परंतु बैठकीसाठी संख्याबळ नसल्याने ती रद्द करावी लागली. आणखी एक, दोन बैठकी घेतल्या असत्या, आणि त्यात संख्याबळ नसते तर ही निवडणूकच रद्द झाली असती. म्हणून सरकारने चार सदस्य नियुक्त करण्याचा निर्णय घेतला, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. काही जण म्हणतात हा निर्णय टिकणार नाही. पण आम्ही अॅडव्होकेट जनरल यांचे मत विचारात घेऊनच हा निर्णय घेतला आहे, असे नमुद करीत त्यांनी कायद्याच्या कसोटीवर हा निर्णय टिकतो की नाही, ते पाहू, असेही त्यांनी स्पष्ट केले.

राहूल गांधी यांच्यावर टीका

काँग्रेसचे नेते व विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गोकुळच्या निवडणुकीवर ट्विट करून मतचोरी असल्याचे म्हटले आहे. राहुल गांधींवर काय परिस्थिती यावी? पंतप्रधान पदाचं स्वप्न पाहणारा व्यक्ती एका छोट्या निवडणुकीवर ट्विट करत आहे. गोकुळमध्ये फक्त साडेचार हजार मतदार आहेत. पण त्यासाठी राहुल गांधींना दिल्लीत बसून ट्विट करावे लागत आहे. हा राष्ट्रीय मुद्दा नाही. पण राहुल गांधी यातही पडत आहेत, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.