अमरावती: राज्य मंत्रिमंडळाने विधिमंडळाला डावलून अध्यादेश काढण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमात बदल करून ५०० कोटींपेक्षा जास्त उलाढालीच्या सहकारी संघांवर सरकार आपले पाच सदस्य बसवणार आहे. त्यातल्या चौघांना मतदानाचा पूर्ण अधिकार असेल. पहिला घाव कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघावर, म्हणजेच गोकुळवर आहे. मतपेटीत जे जिंकता आले नाही, ते आता कायदा वाकवून हिसकावले जात आहे. ही सहकार सुधारणा नाही, शेतकऱ्यांच्या संस्थेवर दिवसाढवळ्या टाकलेला दरोडा आहे, अशी टीका अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजन क्षीरसागर यांनी केली आहे.

मत दूध उत्पादकांचे, सरकारचे नाही

राजन क्षीरसागर म्हणाले, हे संचालक स्वतः अध्यक्ष होऊ शकत नाहीत. पण अध्यक्ष कोण हे मात्र तेच ठरवणार! निवडणुकीत हरलेलीच मंडळी मागच्या दाराने परत येत आहेत. किसान सभेची भूमिका स्पष्ट आहे, आज सतेज पाटील यांच्या आघाडीला कौल मिळाला, उद्या कोणालाही मिळो, मत दूध उत्पादकांचे आहे. सरकारचे नाही. गोकुळमध्ये मतदानानंतर हवे असलेले मतदार आत घुसवले जात आहेत. आज गोकुळ, तर उद्या ग्रामपंचायत, बाजार समिती आणि गावची सोसायटी. शेतकऱ्याने मत द्यायचे आणि सताधाऱ्यांनी निकाल लिहायचा, याला लोकशाही नाही, हुकूमशाही म्हणतात.

अध्यादेश प्रत्येकाला लागू

राजन क्षीरसागर म्हणाले, हा प्रश्न खुर्चीचा नाही, आपल्या भाकरीचा आहे. गोकुळ सुमारे साडेपाच लाख दूध उत्पादकांचा संघ आहे. ७.५०० हून अधिक ग्रामीण दूध संस्था त्याच्याशी जोडलेल्या आहेत. संघ रोज सुमारे १८ लाख लिटर दूध गोळा करतो. २०२४-२५ मध्ये त्याची उलाढाल ३,९६६ कोटी रुपये होती. हाच पैसा दुधाचे बिल, दर फरक आणि दिवाळीचा बोनस बनून आपल्या दुधउत्पादकांच्या घरी येतो. संचालक मंडळ ज्याच्या ताब्यात. या तिजोरीची चावी त्याच्या हातात. आणि हा अध्यादेश राज्यातल्या दूध, साखर आणि पणन क्षेत्रातल्या प्रत्येक मोठ्या संघाला लागू होतो.

सर्व कॉर्पोरेट कंपन्यांसाठी

राजन क्षीरसागर म्हणाले, व्यापार करारात आता एकच अडथळा उरला आहे. अमेरिकेचे अनुदानावर पोसलेले स्वस्त दूध भारतात आणणे. ते आले तर गावोगावच्या संकलन केंद्रावरचा दुधाचा दर कोसळेल. सहकार हा राज्याचा विषय असूनही अमित शहांच्या सहकार मंत्रालयामार्फत सगळी सूत्रे दिल्लीत एकवटली जात आहेत. दिल्लीत केंद्रीकरण आणि मुंबईत अध्यादेश, दोन्हींचा अर्थ एकचः शेतकऱ्यांच्या संस्था सतेच्या मुठीत आणणे आणि कार्पोरेट कंपन्यांसाठी रास्ता मोकळा करणे.