नागपूर : भारतीयांना सोन्याच्या दागिन्यांचे विशेष आकर्षण आहे. सनासुदीच्या काळात विविध धर्मीय नागरिक मोठ्या प्रमाणात सोन्याचे दागिने खरेदी करतात. मात्र सराफा व्यवसायिकांकडून मेकिंग शुल्काच्या नावाखाली सामान्य ग्राहकांची कशा प्रकारे लूट केली जाते, याकडे अखिल भारतीय ग्राहक पंचायतने लक्ष वेधले आहे.
सोन्याचे दागिने तयार करताना सोन्याच्या किमतीच्या १३ ते २५ टक्के प्रमाणात मेकिंग शुल्क आकारून सराफा दुकानदार ग्राहकांची लूट करीत आहेत. भारतीय मानक ब्युरो तसेच जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे अध्यक्ष असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणी तातडीने कडक कारवाई करावी, अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य गजानन पांडे यांनी केली. यापूर्वी दागिन्यांच्या डिझाइननुसार प्रति ग्रॅम प्रमाणे मेकिंग शुल्क आकारले जात होते. त्या वेळी प्रति ग्रॅम १७० ते ४०० रुपये इतके मेकिंग शुल्क घेतले जात असे.
उदाहरणार्थ, १० ग्रॅमची सोन्याची अंगठी तयार करायची असल्यास, प्रति ग्रॅम २०० रुपये मेकिंग शुल्क गृहीत धरल्यास एकूण २ हजार रुपये मेकिंग शुल्क लागत होते. मात्र सध्या सोन्याच्या दागिन्यांच्या एकूण किमतीवर १३ ते १५ टक्के प्रमाणात मेकिंग शुल्क आकारले जात आहे.
आज १० ग्रॅम सोन्याचा दर १ लाख ७० हजार रुपये गृहीत धरल्यास, १३ टक्के प्रमाणे २२ हजार १०० रुपये मेकिंग शुल्क आकारले जाते. तर १५ टक्के प्रमाणे हे शुल्क २५ हजार ५०० रुपयांपर्यंत जाते. याव्यतिरिक्त वस्तू व सेवा कर तसेच हॉलमार्क शुल्क वेगळे घेतले जातेच. प्रत्येक सराफा दुकानदार दागिन्यांच्या डिझाइननुसार सोन्याच्या किमतीवर १३ ते २५ टक्के किंवा त्याहून अधिक मेकिंग शुल्क आकारत असून ही सरळसरळ ग्राहकांची लूट असल्याचा आरोप ग्राहक पंचायतने केला आहे.
हे उदाहरण फक्त १० ग्रॅमच्या अंगठीचे असले, तरी प्रत्यक्षात वजनदार दागिन्यांवर ग्राहकांची लूट अधिक प्रमाणात होत असल्याचेही पांडे यांनी नमूद केले. यापूर्वी डिझाइननुसार प्रति ग्रॅम प्रमाणे मेकिंग शुल्क आकारले जात होते. मात्र आता सोन्याच्या किमतीवर थेट १३ ते २५ टक्के किंवा त्याहून अधिक प्रमाणात मेकिंग शुल्क आकारले जात असल्याकडेही पांडे यांनी लक्ष वेधले आहे.
सोन्याच्या दरवाढीनुसार लुटीच्या रकमेतील वाढ
सराफा बाजारात सोन्याच्या दरात मोठी वाढ होत आहे. या वाढलेल्या दरानुसार सराफा व्यवसायिकांकडून मेकिंग शुल्काच्या नावाखाली ग्राहकांची लूटही वाढत आहे. त्यात वस्तू व सेवा कराची भर पडत असल्याने ग्राहकांवर आर्थिक बोजा वाढत आहे. ही लूट तातडीने थांबवण्याची गरज असल्याची मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतने केली आहे. या गंभीर प्रश्नाकडे त्वरित लक्ष न दिल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही पंचायतच्या ॲड. स्मिता देशपांडे, संजय धर्माधिकारी, गणेश शिरोळे, अनिरुद्ध गुप्ते, प्रकाश भुजाडे, राजू पुसदेकर तसेच अन्य पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

