सोने तारण कर्जाकडे नागपूरकरांचा वाढता कल

नागपुरातील शाखेत  गहाण ठेवण्यात आलेले सोने जवळपास कोटय़वधी रुपयांचे आहे.

प्रतिनिधिक छायाचित्र

वीस टक्के ग्राहकांच्या सोन्याचा लिलाव  

आर्थिक कोंडीत सापडलेल्यांचे सोने गहाण ठेवून तात्काळ व्याजावर पैसे देणाऱ्या खासगी सोने तारण कर्ज (गोल्ड लोन फायनान्स) देणाऱ्या कंपन्या सहज तुमची आर्थिक कोंडी नक्कीच सोडवते. मात्र, खरी कसरत ते गहाण ठेवलेले सोने सोडवताना होत असल्याने नागपूरकरांचे वीस टक्के सोने हे लिलावात जात आहे. तरी देखील सोने तारण कर्ज घेणाऱ्यांची संख्या कमी होताना दिसून येत नाही.

अगदी सोप्या पद्धतीने आणि कमी कागदपत्रात केवळ तीस मिनिटात सोने तारण ठेवून कर्ज देणाऱ्या खाजगी  कंपन्यात शहरात आहे. यामध्ये अग्रक्रमांकावर कोची येथील मुथूट फिनकॉर्प आणि मॅनप्पुरम कंपनीचा समावेश आहे. याशिवाय इतर खासगी बँकाही सोने तारण कर्ज देते.

मात्र, सुलभ हप्ते आणि सोने सोडवण्यासाठी नऊ महिन्यांचा दीर्घ कालावधी मिळत असल्याने नागपूरकर खाजगी कंपन्यांकडे कर्ज घेण्यास वळत आहेत. दहा वर्षांपूर्वीचा विचार केल्यास शहारत केवळ चार ते पाच ठिकाणी खासगी सोने तारण कर्ज देणाऱ्या कंपन्या होत्या. आज त्यांच्यात वाढ  झाली असून चाळीसहून अधिक शाखा शहराच्या विविध भागात आहेत. यावरून त्यांना  चांगला प्रतिसाद मिळतो याची प्रचिती येत असून त्याचाच सरळ अर्थ सोन्यावर कर्ज घेणाऱ्यांच्या संख्येत वाढ  झाली आहे.

तुम्ही दिलेल्या एकूण सोन्याच्या किंमतीवर ८० टक्के रक्कम कर्ज म्हणून झटपट दिली जाते. कर्ज घेणाऱ्यांमध्ये सर्वसामान्य नागरिक आणि शेतकरी जास्त आहेत. घेतलेले कर्ज फेडण्याची क्षमता अनेकात नसल्याने एकूण गहाण ठेवलेल्या ग्राहकांमध्ये तब्बल वीस टक्के ग्राहकांचे सोने लिलावात विकले जात आहे.

सोने तारण कर्ज घेतलेल्यांसाठी ते सोडवण्यासाठी निर्धारित ९ महिन्यांचा कालावधी दिला जातो. तुम्ही सोने सोडवू शकले नाही तर घरच्या पत्त्यावर लिलावपूर्व कंपनीकडून एक पत्र पाठवले जाते. शिवाय तुम्हाला दिलेला पावती क्रमांक वर्तमानपत्रात जाहिरात टाकूनही कळवण्यात येते. त्यानंतर देखील रक्कम भरली नाही तर कायदेशीरपणे कंपनी सोन्याचा लिलाव करून रक्कम वसूल करते. आज शहरात वीस टक्के ग्राहकांचे सोने जे कोटय़वधी रुपयांच्या घरात आहे ते लिलावासाठी जात आहे. जरी याचा थेट फायदा कंपनीला होत असला तरी नियमितपणे कर्जाचे व्याज भरून सोने सोडवणाऱ्यांसाठी सोने तारण कर्ज मदतपूर्वक ठरत आहे.

कोटय़वधीचे सोने 

नागपुरातील शाखेत  गहाण ठेवण्यात आलेले सोने जवळपास कोटय़वधी रुपयांचे आहे. एका शाखेत जवळपास दीडशे ते दोनशे ग्राहकांचे सोने गहाण आहे. खासगी बँकेतून सोने तारण ठेवून कर्ज मिळते. मात्र, ते घेतल्यास दर महिन्याला त्याचे व्याज देणे बंधनकारक असते. असे न केल्यास बँकेचा प्रतिनिधी वसुलीसाठी एकच तकादा लावतो. मात्र, खासगी कंपन्यांकडून सोने गहाण ठेवून घेतलेल्या सोन्याचे व्याज दरमहा भरले नाही तर ९ महिने ग्राहकाला केवळ त्याची सूचना देण्यात येते. त्यामुळे देखील ग्राहक खासगी कंपन्यांकडून सोने कर्ज घेण्यास पसंत करतात.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Gold loan trend increasing in nagpur