नागपूर : सोने-चांदीचे दर नियंत्रणात येत नसताना, रोज नवी विक्रमी उंची गाठणाऱ्या दरांमध्ये आता मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे एकेकाळी वस्तू व सेवा कर (जीएसटी) आणि मेकिंग चार्ज वगळता २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅम १.८४ लाख रुपयांवर गेलेला असताना तो सुमारे दीड लाख रुपयांपर्यंत खाली आला आहे. यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

करोना काळात सोने-चांदीचे दर घसरले होते; मात्र करोना नियंत्रणात आल्यानंतर या दरांनी झपाट्याने वाढ घेतली. बघता बघता २९ जानेवारी २०२६ रोजी नागपुरातील सराफा बाजारात २४ कॅरेट सोन्याचा दर (जीएसटी व मेकिंग शुल्क वगळता) प्रति दहा ग्रॅम १ लाख ८१ हजार ४०० रुपयांच्या विक्रमी उंचीवर पोहोचला होता. मात्र आता या दरात मोठी घसरण होत आहे.

नागपुरातील सराफा बाजारात १२ फेब्रुवारी २०२६ रोजी सोन्याचे दर प्रति १० ग्रॅम पुढीलप्रमाणे नोंदवण्यात आले होते त्यानुसार २४ कॅरेट – १ लाख ५७ हजार ६०० रुपये, २२ कॅरेट – १ लाख ४६ हजार ६०० रुपये, १८ कॅरेट – १ लाख २१ हजार ४०० रुपये, १४ कॅरेट – ९५ हजार ३०० रुपये, तर ९ कॅरेट – ६३ हजार रुपये. मात्र दुसऱ्याच दिवशी या दरात मोठी घसरण झाली.

नागपुरात १३ फेब्रुवारीला २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १ लाख ५४ हजार ८०० रुपये, २२ कॅरेट – १ लाख ४४ हजार रुपये, १८ कॅरेट – १ लाख १९ हजार २०० रुपये, १४ कॅरेट – ९३ हजार ७०० रुपये, तर ९ कॅरेट – ६१ हजार ९०० रुपये असा नोंदवण्यात आला. त्यामुळे नागपुरात एकाच दिवसात सोन्याचे दर २४ कॅरेटमध्ये २ हजार ८०० रुपये, २२ कॅरेटमध्ये २ हजार ६०० रुपये, १८ कॅरेटमध्ये २ हजार २०० रुपये, १४ कॅरेटमध्ये १ हजार ६०० रुपये आणि ९ कॅरेटमध्ये १ हजार १०० रुपयांची घसरण झाल्याचे दिसून येते. सोन्याच्या दरातील घसरणीचा क्रम कायम असल्याचे चित्र आहे.

२४ तासांत चांदीच्या दरात १३ हजारांची घसरण

नागपुरातील सराफा बाजारात चांदीचे दर (जीएसटी व मेकिंग चार्ज वगळता) १२ फेब्रुवारी रोजी प्रति किलो २ लाख ६१ हजार ७०० रुपये नोंदवण्यात आले होते. हेच दर १३ फेब्रुवारी रोजी २ लाख ४८ हजार ८०० रुपये इतके नोंदवले गेले. त्यामुळे चांदीच्या दरात अवघ्या २४ तासांत तब्बल १२ हजार ९०० रुपयांची घसरण झाल्याचे दिसून येते.