नागपूर : सध्या सोन्याचे दर काहीसे कमी झाले असले, तरी ही घसरण तात्पुरती असल्याचा दावा अखिल भारतीय रत्न व दागिने देशांतर्गत परिषदेचे (जीजेसी) अध्यक्ष राजेश रोकडे यांनी केला आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे दर सध्या कमी झाले असले, तरी येत्या दिवाळीपर्यंत प्रति दहा ग्रॅम सोन्याचा दर १ लाख ७० हजार रुपयांपर्यंत पोहोचू शकतो, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोन्याच्या खरेदीबाबतच्या आवाहनावरही त्यांनी भूमिका स्पष्ट केली.
दिवाळीपर्यंत सोन्याचे दर पुन्हा वाढण्याचा अंदाज का?
राजेश रोकडे यांच्या मते, सध्या प्रति दहा ग्रॅम सोन्याचा दर सुमारे १.४० ते १.४५ लाख रुपयांदरम्यान आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील घडामोडींमुळे दरात तात्पुरती घसरण झाली आहे. मात्र, सोन्याच्या किमतींचा दीर्घकालीन कल वाढीचाच असून, दिवाळीपर्यंत त्या पुन्हा १ लाख ७० हजार रुपयांपर्यंत पोहोचू शकतात. त्यामुळे सध्याचा काळ सोने खरेदीसाठी अनुकूल असल्याचे त्यांनी सांगितले.
पंतप्रधानांच्या आवाहनावर सराफा व्यवसायाची भूमिका काय?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही काळ नवीन सोने खरेदी टाळण्याचे आवाहन केले होते. या पार्श्वभूमीवर देशातील सराफा व्यवसायात चिंता निर्माण झाली होती. मात्र, सरकारच्या भूमिकेवर टीका करण्याऐवजी सकारात्मक मार्ग शोधण्याचा प्रयत्न केल्याचे रोकडे यांनी स्पष्ट केले.
या निर्णयाचा किती लोकांवर परिणाम होऊ शकतो?
देशात दागिन्यांच्या व्यवसायाशी संबंधित सुमारे पाच लाख दुकाने आहेत. प्रत्येक दुकानात पाच ते सात कर्मचारी काम करतात. त्यानुसार सुमारे ७५ लाख लोकांची उपजीविका या क्षेत्रावर अवलंबून आहे. दागिन्यांच्या पेट्या, पॅकिंग, वाहतूक, कारागीर आणि इतर पूरक उद्योगांचा विचार केल्यास सुमारे दोन ते अडीच कोटी नागरिकांचा रोजगार या व्यवसायाशी जोडलेला असल्याचा दावा रोकडे यांनी केला.
सरकारशी कोणती चर्चा झाली?
या विषयावर अखिल भारतीय रत्न व दागिने देशांतर्गत परिषदेने केंद्र सरकारशी तीन ते चार वेळा चर्चा केल्याचे त्यांनी सांगितले. सराफा व्यवसाय पिढ्यान् पिढ्या सुरू असून, तो दीर्घकाळ थांबविणे व्यवहार्य नसल्याचे सरकारच्या निदर्शनास आणून दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सरकारला कोणता पर्याय सुचवला?
सराफा व्यवसायावर परिणाम होऊ न देता सोन्याची आयात कमी करण्यासाठी सरकारला मौद्रीकरण योजना सुचविल्याचे रोकडे म्हणाले. या प्रस्तावावर लवकरच निर्णय होण्याची अपेक्षा असून, त्यामुळे सोन्याची आयात कमी करण्याचे सरकारचे उद्दिष्टही साध्य होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ग्राहकांनी काय करावे?
सोन्याच्या किमती पुन्हा वाढण्याची शक्यता लक्षात घेता, सध्याचे तुलनेने कमी दर ग्राहकांसाठी खरेदीची चांगली संधी असल्याचे राजेश रोकडे यांनी सांगितले. त्यांच्या मते, सोन्याच्या किमतींचा दीर्घकालीन कल वाढीचाच राहणार असल्याने भविष्यात दर आणखी वाढू शकतात.
