नागपूर : सोने- चांदीचे दर रोज वाढून नवीन उंची गाठत असल्याचे चित्र होते. त्यातच शुक्रवारी (३० जानेवारी) ग्राहकांसाठी गोळ बातमी पुढे आली आहे. एकाच दिवसात सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. एकाच दिवसात सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम तब्बल ७ हजार ३०० रुपयांनी घसरले आहे. त्यामुळे २४ तासांत सोन्याचे दर विक्रमी किमतीने घसरले आहे. त्यामुळे दागिने खरेदीसाठी इच्छुक असलेल्या ग्राहकांना आंशिक दिलासा मिळाला आहे.

सोने- चांदीसह इतरही धातूचे भारतात सगळ्याच जाती- धर्मच्या नागरिकांमध्ये आकर्षण आहे. दसरा, दिवाळीसह इतरही मुहर्तावर सोने- चांदीचे दागिने, देवी- देवतांची मुर्तीसह इतरही वस्तू अनेक जण खरेदी करतात. दरम्यान नागपुरातील सराफा बाजारात २९ जानेवारी २०२५ रोजी जीएसटी व मेकिंग शुल्क वगळता सोन्याचे दर २४ कॅरेटमध्ये प्रति दहा ग्राम १ लाख ८१ हजार ४०० रुपये, २२ कॅरेटमध्ये १ लाख ६८ हजार ७०० रुपये, १८ कॅरेटमध्ये १ लाख ३९ हजार ७०० रूपये, १४ कॅरेटमध्ये १ लाख ९ हजार ७०० रुपये, ९ कॅरेटमध्ये ७२ हजार ६०० रुपये होते.

हे दुसऱ्याच दिवशी ३० जानेवारी २०२५ रोजी २४ कॅरेटमध्ये प्रति दहा ग्राम १ लाख ७४ हजार १०० रुपये, २२ कॅरेटमध्ये १ लाख ६१ हजार ९०० रुपये, १८ कॅरेटमध्ये १ लाख ३४ हजार १०० रुपये, १४ कॅरेटमध्ये १ लाख ५ हजार ३०० रुपये, ९ कॅरेटमध्ये ६९ हजार ६०० रुपये नोंदवले गेले. त्यामुळे सोन्याचे दर २९ जानेवारीच्या तुलनेत ३० जानेवारीला २४ कॅरेटमध्ये प्रति दहा ग्राम ७ हजार ३०० रुपये, २२ कॅरेटमध्ये ६ हजार ८०० रुपये, १८ कॅरेटमध्ये ५ हजार ६०० रुपये, १४ कॅरेटमध्ये ४ हजार ४०० रुपये, ९ ग्राममध्ये ३ हजार रुपये घसरले आहे.

चांदीच्या दरात १० हजारांची घसरण…

नागपुरातील सराफा बाजारात चांदीचे दर २९ जानेवारीला जीएसटी आणि मेकिंग शुल्क वगळून प्रति किलो ३ लाख ८९ हजार ५०० रुपये होते. हे दर ३० जानेवारीला प्रति किलो ३ लाख ७९ हजार ५०० रुपये नोंदवले गेले. त्यामुळे नागपुरात २९ जानेवारीच्या तुलनेत ३० जानेवारीला चांदीचे दर प्रति किलो १० हजार रुपयांनी घसरले आहे.

प्लॅटिनमच्या दरात मात्र उलटी स्थिती…

प्लॅटिनम धातूचे दर २९ जानेवारीला ८० हजार प्रति दहा ग्राम होते. ३० जानेवारीला हे दर ९० हजार रुपये झाले. त्यामुळे प्रति दहा ग्राम तब्बल १० हजार रुपयांची वाढ झाली.