नागपूर : दिवाळीच्या तोंडावर सोने-चांदी खरेदी करण्याच्या तयारीत असलेल्या ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून उच्चांकाच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या सोने आणि चांदीच्या दरांनी आता घसरणीचा मार्ग धरला आहे. अवघ्या चार दिवसांत सोन्याच्या दरात तोळ्यामागे पाच हजार रुपयांहून अधिक, तर चांदीच्या दरात किलोमागे तब्बल १२ हजार रुपयांची घट झाली आहे. त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
नेमकी किती झाली दरात घसरण?
नागपूर सराफा बाजारातील २९ ऑक्टोबर आणि २ नोव्हेंबरच्या शिफारस केलेल्या दरांची तुलना केल्यास सोन्याच्या दरातील घसरण स्पष्ट होते. २९ ऑक्टोबरला ९९.५ शुद्धतेच्या प्रमाणित सोन्याचा विक्रीदर प्रतिदहा ग्रॅम १ लाख ४३ हजार ९०० रुपये होता. तो २ नोव्हेंबरला १ लाख ३८ हजार ८०० रुपयांवर आला. म्हणजेच चार दिवसांत प्रतिदहा ग्रॅममागे ५ हजार १०० रुपयांची घट झाली. २२ कॅरेट सोन्याचा दरही १ लाख ३३ हजार ८०० रुपयांवरून १ लाख २९ हजार १०० रुपयांपर्यंत खाली आला. यात ४ हजार ७०० रुपयांची घसरण नोंदविण्यात आली.
चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली का?
सोन्याप्रमाणेच चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली आहे. २९ ऑक्टोबरला चांदीचा विक्रीदर प्रतिकिलो १ लाख ९६ हजार ७०० रुपये होता. २ नोव्हेंबरला तो १ लाख ८४ हजार ६०० रुपयांवर आला. म्हणजेच किलोमागे १२ हजार १०० रुपयांची घट झाली. दागिन्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या चांदीचा दरही १ लाख ९४ हजार ८०० रुपयांवरून १ लाख ८२ हजार ८०० रुपयांपर्यंत घसरला.
प्लॅटिनमच्या दरात काय बदल झाला?
सोने आणि चांदीच्या दरात घसरण होत असताना प्लॅटिनमचा दर मात्र स्थिर आहे. दोन्ही दिवशी त्याचा विक्रीदर प्रतिदहा ग्रॅम ८८ हजार रुपये, तर खरेदीदर ८३ हजार ६०० रुपये कायम राहिला.
ग्राहकांना किती फायदा होणार?
सोन्या-चांदीच्या दरातील घसरणीमुळे ग्राहकांना खरेदीसाठी काहीसा दिलासा मिळू शकतो. मात्र, दागिन्यांच्या अंतिम किमतीत घडणावळ, मुद्रांकन शुल्क आणि वस्तू व सेवा कर अतिरिक्त आकारला जाणार आहे. त्यामुळे प्रत्यक्ष खरेदीच्या वेळी अंतिम किंमत बदलू शकते. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दरातील ही घसरण कायम राहणार की पुन्हा दरवाढ होणार, याकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे.
