नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विश्व संवाद केंद्राकडून बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले आहे. यावेळी संघाचे दुसरे सरसंघचालक गोळवलकर गुरूजी बाबासाहेबांबद्दल काय बोलले होते? हा संदेशही समाज माध्यमांवर पसरवण्यात आला आहे. गोळवलकरांच्या विचारांचं संकलन असलेल्या ‘बंच ऑफ थॉट्स’ या पुस्तकावरून त्यांच्यावर अनेकदा टीकाही होते. अशातच त्यांचा बाबासाहेबांबद्दलचा संदेश महत्त्वाचा आहे.
काय आहे संदेश?
“पूज्यनीय डॉ. आंबेडकरांच्या पवित्र स्मृतीस आदरांजली वाहणे हे माझे स्वाभाविक कर्तव्य आहे. त्यांनी आपल्या समाजातील ‘अस्पृश्यता’ या दुष्ट प्रथेशी संबंधित सर्व रूढींवर जोरदार हल्ला चढवला आणि समाजाला एक नवीन समाज निर्माण करण्याचे आवाहन केले. त्यांचे कार्य असाधारण आहे. त्यांनी आपल्या राष्ट्रावर मोठे उपकार केले आहेत. हे उपकार इतके मोठे आहेत की त्यांची परतफेड करणे कठीण आहे. – माधव सदाशिवराव गोळवलकर (राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक) – १९७३”
संघ आणि डॉ. आंबेडकरांचा खरच संबंध आला का?
सामाजिक लोकशाहीचा अर्थ दुसरा तिसरा काही नाही तर सामाजिक समरसता आहे. जिथे देशवासियांमध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव नसावा. विशेष गोष्ट म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनीही अस्पृश्यता आणि शिवाशिव मिटवण्यासाठी सतत प्रयत्न केले. तसेच संघाच्या शाखांमध्ये हे प्रयत्न व्यावहारिक रुपाने साकारले. याचं एक जिवंत उदाहरण म्हणजे १९३९ मध्ये पुण्यात आयोजित संघ शिक्षा वर्गात पाहायला मिळते. त्याचे प्रत्यक्षदर्शी डॉ. आंबेडकर होते, असे संघाकडून सांगितले जाते.

संघाच्या या शिक्षा वर्गात संध्याकाळच्या सत्रात डॉ. आंबेडकर आले होते. त्यावेळी तिथे डॉ. हेडगेवारही उपस्थित होते. त्यावेळी सुमारे ५२५ स्वयंसेवकांच्यासमोर उभे राहून हेडगेवार यांनी आंबेडकरांना सांगितलं की, यातील किती स्वयंसेवक अस्पृश्य आहेत हे पाहून घ्या. प्रत्येक रागेंत जाऊन ते म्हणाले, इथे कोणीही अस्पृश्य व्यक्तीला ओळखू शकत नाही. त्यावेळी त्यांनी आंबेडकरांना आग्रह केला की, तुम्ही स्वत: स्वयंसेवकांना विचारा. त्यावेळी आंबेडकरांनी स्वयंसेवकांना म्हटलं, जे अस्पृश्य असतील त्यांनी एक पाऊल पुढे यावे. आंबेडकरांच्या या आवाहनानंतरही कोणतीच हालचाल झाली नाही. त्यावर आंबेडकर म्हणाले, मी आधीच सांगत होतो ना. त्यावर हेडगेवार म्हणाले, संघात कुणालाही अस्पृश्य असल्याचा अनुभव येऊ दिला जात नाही. बाबासाहेब संघाच्या शाखेत आले होते ही माहिती संघाकडून दिली जाते.
