गोंदिया : जिल्ह्याच्या प्रशासनाचा गाडा ज्या इमारतीतून दिवस-रात्र चालतो, त्याच नविन प्रशासकीय इमारतीत सध्या मधमाश्यांच्या गुंजारवामुळे अनपेक्षित संकट निर्माण झाले आहे. जयस्तंभ चौक परिसरातील चार मजली प्रशासकीय इमारतीच्या तिसऱ्या व चौथ्या मजल्यावरील खिडक्यांच्या बाहेरील भागात मधमाश्यांनी मोठमोठी पोळी बांधल्याने अधिकारी, कर्मचारी आणि कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी, कडक उकाडा आणि दमट वातावरण असतानाही अनेक कार्यालयांमध्ये खिडक्या बंद ठेवूनच कामकाज सुरू असल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यातील विविध विभागांचे कामकाज या इमारतीतून चालते. दररोज शेकडो नागरिक विविध प्रशासकीय कामांसाठी येथे येत असतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून मधमाश्यांची वाढती वर्दळ आणि विशाल पोळ्यांमुळे इमारतीच्या काही भागांत अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः चौथ्या मजल्यावरील कार्यालयांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना याचा मोठा फटका बसत आहे.
२४ जून रोजी प्रत्यक्ष पाहणी केली असता, चौथ्या मजल्यावरील एका खिडकीबाहेर मोठे पोळे स्पष्टपणे दिसून आले. दुपारच्या सुमारास वीजपुरवठा खंडित झाल्याने इमारतीत प्रचंड उकाडा जाणवत होता. अशा परिस्थितीतही सहायक उप-नोंदणी कार्यालयातील कर्मचारी खिडक्या बंद ठेवून काम करत असल्याचे निदर्शनास आले. खिडकी उघडल्यास मधमाश्यांचा थवा कार्यालयात शिरण्याची शक्यता असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून खिडक्या बंद ठेवाव्या लागत असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.
उष्णतेच्या लाटा अंगावर झेलत, घामाच्या धारा पुसत कर्मचारी काम करताना दिसत होते. एका बाजूला नागरिकांची कामे वेळेत पूर्ण करण्याची जबाबदारी, तर दुसऱ्या बाजूला मधमाश्यांच्या संभाव्य हल्ल्याची भीती, अशा दुहेरी कोंडीत कर्मचारी अडकले आहेत. काही कर्मचाऱ्यांनी नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सांगितले की, खिडकीजवळ किंचित हालचाल झाली किंवा अचानक आवाज झाला तरी मधमाश्या अस्वस्थ होऊन मोठ्या प्रमाणात भिरभिरू लागतात. त्यामुळे दिवसभर सतर्क राहावे लागत आहे.
हा प्रश्न केवळ कर्मचाऱ्यांपुरता मर्यादित राहिलेला नाही. प्रशासकीय कामांसाठी येणारे वृद्ध नागरिक, महिला आणि विद्यार्थ्यांनाही याचा त्रास सहन करावा लागत आहे. एखाद्या नागरिकाला अचानक मधमाश्यांनी डंख मारल्यास गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पोळ्यांचे तातडीने व्यवस्थापन करण्याची मागणी जोर धरत आहे.
दरम्यान, निसर्गाच्या दृष्टीने मधमाश्यांचे महत्त्व अनन्यसाधारण मानले जाते. परागीभवनाच्या प्रक्रियेत त्यांचे योगदान अत्यंत मोलाचे असून शेती उत्पादनवाढ आणि पर्यावरणीय संतुलन राखण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळे त्यांचे संवर्धन आवश्यक असले तरी मानवी वर्दळीच्या ठिकाणी निर्माण झालेली पोळी सुरक्षित आणि पर्यावरणपूरक पद्धतीने अन्यत्र स्थलांतरित करणेही तितकेच गरजेचे ठरते.
यासंदर्भात उपविभागीय अधिकारी चंद्रभान खंडाईत यांनी सांगितले की, प्रशासकीय इमारतीतील काही भागांमध्ये नैसर्गिकरीत्या मधमाश्यांची पोळी तयार झाली आहेत. प्रशिक्षित कर्मचाऱ्यांच्या मदतीने ही पोळी सुरक्षितरीत्या हटविण्याचे प्रयत्न लवकरच करण्यात येतील. नागरिक आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत आवश्यक उपाययोजना करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्याच्या कारभाराचे केंद्रबिंदू असलेल्या या इमारतीत सध्या फाइलांच्या खडखडाटाबरोबरच मधमाश्यांच्या गुंजारवाचीही चर्चा रंगू लागली आहे. प्रशासनाने वेळेत पावले उचलली नाहीत, तर एखादी अप्रिय घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पर्यावरणपूरक आणि सुरक्षित मार्गाने या समस्येचे निराकरण करण्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
