गोंदिया : गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यात तावसी-इटखेडा मार्गालगतच्या जंगलात मानवी कवटी आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही कवटी नेमकी कोणाची आहे, संबंधित व्यक्तीचा मृत्यू कधी आणि कोणत्या परिस्थितीत झाला, याबाबत अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती समोर आलेली नसल्याने या घटनेने अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. मोरगाव अर्जुनी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला असून फॉरेन्सिक अहवालाची प्रतीक्षा आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तावसी येथील रहिवासी फिरोज अल्ताफ पठाण यांना गावातील हरिचंद अतवारी बघवा यांनी जंगलात मानवी कवटी दिसल्याची माहिती दिली. तावसी-इटखेडा मार्गाच्या उजव्या बाजूला असलेल्या जंगलात भाजी तोडण्यासाठी गेलेल्या हरिचंद बघवा यांना ही कवटी आढळली. माहिती मिळताच फिरोज पठाण, निलज येथील पोलिस पाटील पंकज कापगते आणि हरिचंद बघवा यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता ती मानवी कवटी असल्याची खात्री झाली.
यानंतर तत्काळ मोरगाव अर्जुनी पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिस निरीक्षक काले यांच्या मार्गदर्शनाखाली उपपोलीस निरीक्षक नलावडे आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वैद्यकीय अधिकारी तसेच फॉरेन्सिक तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले. फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळासह परिसरातील जंगलाची सखोल तपासणी केली. मात्र, प्राथमिक पाहणीत कवटीव्यतिरिक्त इतर कोणतेही मानवी अवशेष किंवा संशयास्पद वस्तू आढळून आल्या नाहीत.
तपास यंत्रणेसमोर सध्या सर्वात मोठे आव्हान म्हणजे मृत व्यक्तीची ओळख पटविणे हे आहे. कवटी किती जुनी आहे, ती पुरुषाची की महिलेची, तसेच मृत्यू नैसर्गिक, अपघाती की अन्य कारणांमुळे झाला, याबाबतचे चित्र वैज्ञानिक तपासणीनंतरच स्पष्ट होणार आहे. पोलिसांनी कवटीचा पंचनामा करून ती ताब्यात घेतली असून डीएनए व इतर वैज्ञानिक चाचण्यांसाठी पाठविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
दरम्यान, परिसरातील बेपत्ता व्यक्तींच्या नोंदींचीही पडताळणी करण्यात येत असून फॉरेन्सिक अहवाल आणि तांत्रिक तपासाच्या आधारे या गूढ प्रकरणाचा उलगडा करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. तपास पूर्ण झाल्यानंतरच या घटनेमागील वास्तव समोर येणार आहे.
