गोंदिया: शासनाची पूर्वपरवानगी न घेता ‘लकी ड्रॉ’मध्ये सहभाग घेत मोटार (महिंद्रा एसयूव्ही) जिंकणे गोंदियाच्या सहाय्यक धर्मदाय आयुक्त (परिविक्षाधीन) दिशा पजई यांना चांगलेच भोवले. महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ च्या नियम १२, १३ व १९ चा भंग केल्याच्या कारणावरून राज्याचे प्रधान सचिव व विधि परामर्शी यांनी राज्यपालांच्या आदेशावरून शिस्तभंगाची कार्यवाही करत त्यांना निलंबित केले. तसे पत्रही शुक्रवारी सायंकाळी निर्गमित करण्यात आले.

नागपूर येथील एका प्रसिद्ध ज्वेलर्सतर्फे सोने खरेदीवर ‘लकी ड्रॉ’ योजना आयोजित करण्यात आली होती. ज्यामध्ये पजई यांनी शासनाची पूर्वपरवानगी न घेता सहभाग घेतला. त्यांनी मोटार जिंकली व ज्वेलर्सतर्फे गोंदिया येथे नवीन प्रतिष्ठानच्या उद्घाटनाप्रसंगी मोटारीचा स्वीकारही केला. यावर राज्याचे प्रधान सचिव व विधि परामर्शी दिलीप शिवाजीराव घुमरे यांनी राज्याचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार पजई यांच्यावर शिस्तभंगाची कार्यवाही करुन त्यांना निलंबित केले. त्याचबरोबर हे आदेश अंमलात असेपर्यंतच्या कालावधीत त्यांना गोंदिया येथे मुख्यालय देण्यात आले. पूर्व परवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नसल्याचे आदेशात नमूद आहे.

…तर निर्वाह भत्ताही जाणार

महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ च्या नियम १६ च्या तरतूदी लक्षात घेता पजई यांना निलंबित असताना कोणत्याही प्रकारची खासगी नोकरी स्वीकारणे किंवा व्यवसाय करणे अनुज्ञेय राहणार नाही. तसे केल्यास त्यांना गैरवर्तणूकीसाठी दोषी समजले जाईल आणि उचित कारवाई करण्यात येईल. तसेच या काळात निर्वाह भत्त्यावर त्यांचा हक्क राहणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

मंत्रालयात तक्रारी

पजईंविरुद्ध मंत्रालयात विविध तक्रारी झाल्या आहेत. कर्तव्यावर असताना पजईंच्या कठोर कृतींबरोबरच विविध संस्थांवर दबाव आणल्याच्या चर्चाही शहरात गाजल्या. ‘लकी ड्रॉ’वरून त्यांचे नाव चर्चेच्या केंद्रस्थानी होते. या प्रकरणाच्या पुढील तपासात काय निष्पन्न होते, याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.

तर्कवितर्कांना उधाण

‘लकी ड्रॉ’ योजनेवरून अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे. पजई यांना मिळालेली मोटार थेट शोरूममधून आणलेली नव्हती, तर ती काही दिवसांपूर्वी खरेदी केली होती. नोंदणीनंतर मोटार धुतली गेली, शोरूममधील मोटारीसारखी सजवली गेली आणि नंतर पजई यांना सादर केली गेली, असा दावा काहींनी केला आहे. ज्वेलर्सचा मोफत प्रसिद्धीचा प्रस्ताव स्वीकारून त्यांना मोटार देण्यात आली, अशीही चर्चा आहे.