गोंदिया : तालुक्यातील अदासी येथील गावकऱ्यांनी एकत्र येत ग्रामसभेत गावात दारूबंदीचा करण्याचा ठराव पारित केला. नियमानुसार मतदान प्रक्रिया घेण्यात आली. त्यात दारूबंदीसाठी विक्रमी मतदान झाले. याचाच आधार घेत जिल्हाधिकाऱ्यांनी अदासी येथील बिअरबार बंद करण्याचे आदेश पारित केले. त्यामुळे येथील बिअरबारला कायमचे कुलूप लागल्याने गावकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
दारूमुळे अख्खे आयुष्य उद्ध्वस्त होते, मुलाबाळांची आबाळ होते. संसार विस्कळीत होतो. गावातील तरुणाई रसातळाला लागते. हे सर्व हेरून अदासी येथील काही नवयुवक व गावातील महिलांच्या एकजुटीने गावात दारूबंदी करण्यासाठी पाऊल उचलले. २६ जानेवारी २०२५ रोजी ग्रामपंचायत अदासीच्या विशेष ग्रामसभेत गावातील अवैध दारूविक्री तसेच गावात सुरू असलेले बिअर बार बंदीबाबत ठराव मंजूर करण्यात आला.
गावातील अवैध दारू विक्री १ फेब्रुवारीपासून बंद करण्यात आली. यानंतर १९ एप्रिल २५ रोजी महिलांची विशेष ग्रामसभा निवडणूक घेण्यात आली. त्यात १२३२ महिलांपैकी ७८८ महिलांनी आपली उपस्थिती लावली. त्यात शून्य विरुद्ध ७८८ मतांनी ठराव मंजूर करण्यात आला. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी १९ मे २०२५ रोजी आपले समक्ष अंतिम सुनावणी घेऊन बिअर बार बंदीवर शिक्कामोर्तब केले.
तसेच २९ मे रोजी आदेशावर स्वाक्षरी केली. अदासीच्या ग्रामपंचायत प्रशासन व दारूबंदी समिती तसेच गावातील महिलांच्या एकतेचा विजय झाला. अविनाश उजवणे यांचे नावे असलेले मे. वाईन वल्ड बिअर बार ॲन्ड रेस्टॉरंटला जिल्हाधिकारी व राज्य उत्पादन शुल्क विभागाने कुलूप ठोकले.
सतत जनजागृती सुरू
गावातील माजी-आजी प्रतिष्ठित व्यक्ती आणि ज्येष्ठांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद घेऊन ग्राम प्रशासन आणि ग्रामस्वच्छता संघ यांनी गावात विशेष महिला आणि पुरुषांशी भेट, सभा, मुलाखत घेऊन दारूबंदीबाबत जनजागृती केली. ग्रामपंचायत प्रशासन, दारूबंदी समितीचे अध्यक्ष, ग्राम स्वच्छता संघ, तंटामुक्ती समिती, विविध कार्यकारी समिती अदासीचे सर्व सदस्य व गावातील प्रतिष्ठित नागरिक व महिलांनी सहकार्य केले.
पाठपुराव्याला यश
२६ जानेवारी २०२५ रोजी ग्राम प्रशासनाने गावाची विशेष सभा बोलावून बहुमताने गावातील अवैध तथा अनुज्ञप्ती (लायसेन्स) असलेली बिअरबार बंदीबाबत ठराव पारित केले. तेव्हापासून ग्राम प्रशासन अदासी आणि ग्रामस्वच्छता संघ अदासी यांनी राज्यपाल, मुख्यमंत्री, पंतप्रधान, जिल्हाधिकारी, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क कार्यालय यांच्याशी पत्रव्यवहार आणि सतत पाठपुरावा करीत केला. दारूबंदीचा आदेश होताच गावकऱ्यांनी गावात दिवाळीसारखा जल्लोष केला.