गोंदिया : देवरी तालुक्यातील बेलगाव येथील जिल्हा परिषद मालकीच्या तलावात मोठ्या प्रमाणावर मासे आज गुरुवार २७ ऑगस्ट रोजी मृतावस्थेत आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. तलावालगतच्या शेतात खोडकिडीच्या नियंत्रणासाठी करण्यात आलेल्या कीटकनाशकांच्या फवारणीतील रसायन पाण्यात मिसळल्याने माशांचा मृत्यू झाला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून तपासणीनंतरच सत्य समोर येणार आहे.

बेलगाव येथील गट क्रमांक १४ मधील १.३८ हेक्टर क्षेत्रफळाचा हा तलाव जिल्हा परिषद मालकीचा आहे. पंकज मत्स्य पालन सहकारी संस्था, पलानगाव हिने २०२२ ते २०२७ या पाच वर्षांसाठी तलाव लीजवर घेतला आहे. संस्थेने गेल्या दोन वर्षांत मत्स्यबीज सोडून माशांचे संगोपन केले होते. त्यामुळे तलावातील अनेक मासे एक ते पाच किलो वजनाचे झाले होते.

दरम्यान, खोडकिडीचा प्रादुर्भाव झाल्याचे सांगून तलावालगतच्या बांधावर शांतिलाल रामसु पडोटी यांनी ‘Corola’ आणि ‘Blue Chip’ या कीटकनाशकांची फवारणी केल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर तलावातील पाण्यावर मोठ्या संख्येने मृत मासे तरंगताना दिसून आले. त्यामुळे फवारणीतील रसायन पाण्यात मिसळल्याचा संशय बळावला आहे.

फवारणी की अन्य विषारी द्रव्य?

केवळ एका बांधावर झालेल्या फवारणीमुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात मासे मृत्युमुखी पडू शकतात का, असा सवाल संस्थेचे सभासद व ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत. तलावात अन्य कोणते विषारी द्रव्य मिसळले गेले होते का, याचाही तपास करण्याची मागणी होत आहे. त्यामुळे आरोप-प्रत्यारोपांऐवजी वैज्ञानिक पद्धतीने तपासणी निर्णायक ठरणार आहे.

मत्स्य संस्थेला दोन लाखांचा फटका

या घटनेत मत्स्य संस्थेचे सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती संस्थेचे सचिव तुलाराम कुराडे यांनी दिली. मत्स्य व्यवसायावर अवलंबून असलेल्या कुटुंबांच्या उपजीविकेलाही याचा फटका बसला आहे.

वैज्ञानिक तपासणीची मागणी

तलावातील पाणी, मृत मासे आणि वापरण्यात आलेल्या कीटकनाशकांचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत तपासणी करावी, अशी मागणी होत आहे. कृषी, मत्स्य व महसूल विभागाने घटनास्थळी पाहणी करून पंचनामा करावा, अशीही अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, दोषींवर कारवाईच्या मागणीसाठी चिचगड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. भारतीय न्याय संहितेतील कलम ३२४(४) अन्वये पुढील कार्यवाही सुरू असल्याचे सांगण्यात आले. आता तपासाच्या माध्यमातून तलावातील हजारो माशांच्या मृत्यूचे गूढ उलगडते का, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.