गोंदिया: दिल्ली येथे सुरू असलेल्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पीठासीन अधिकारी यांच्यावर पेपर भिरकावल्याप्रकरणी महाराष्ट्रातील गोंदिया भंडारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांना अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी लोकसभेतून निलंबित करण्यात आले आहे.
लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत माजी लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या अप्रकाशित पुस्तकातील मजकुराचा उल्लेख करताच सभागृहात सोमवार २ फेब्रुवारी रोजी रणकंदन माजले होते. मंगळवार ३ फेब्रुवारी रोजी संसदेची कारवाई सुरू होताच लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली असता त्यांना लोकसभेत पिठासीन अधिकारी यांनी त्यांना बोलण्यापासून थांबवले. याला विरोध म्हणून काँग्रेस पक्षाचे काही खासदार हे पिठासीन अधिकारी यांच्या आसना जवळ धावून गेले आणि पिठासीन अधिकारी यांच्या दिशेने पेपर भिरकावल्या प्रकरणी प्रशांत पडोळे यांना निलंबित करण्यात आले आहे.
पडोळे यांचे निलंबन अर्थसंकल्पीय अधिवेशनापर्यंत असणार आहे. पडोळेंसह विरोधी पक्षातील एकूण आठ खासदारांची निलंबन करण्यात आलेले आहे. यात पंजाब राज्यातील खासदार अमरिंदर सिंग राजा वारिंग, खासदार मणिकम टैगोर, खासदार हिब्बी एडन, खासदार गुरजीत सिंग औजला , सी. किरण कुमार रेड्डी, खासदार एस. वेंकटेश्वरन आणि खासदार डीन कुरियाकोसे यांचा समावेश आहे. लोकसभेत या गदारोळानंतर संसदेचे कामकाज उद्यापर्यंत तहकूब करण्यात आले आहे.
या नंतर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस खासदारांनी लोकसभेतून पक्षाच्या खासदारांच्या निलंबना विरोधात संसदेबाहेर निदर्शने केली. प्रचंड गदारोळाच्या दरम्यान, लोकसभेचे कामकाज उद्या (४ फेब्रुवारी २०२६) सकाळी ११ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.

