गोंदिया: इराण आणि अमेरिका, इस्रायल युद्धामुळे आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे दुबईसह अन्य भागांत जिल्ह्यातील अनेक जण अडकले आहेत. शनिवारपासून दुबईमधील भारतीयांना क्षेपणास्त्रे पडण्याच्या आणि स्फोटांच्या आवाजामुळे अडचणी येत आहेत. भारतात आपल्या घरी परतण्यासाठी ते भारत सरकारकडे विनवणी करीत आहेत. गोंदियातील केलनका कुटुंबीयांसह अन्य काही जण दुबईत अडकल्याची माहिती आहे.
भारतीय जनता पक्षाचे जिल्हा महामंत्री सुनील केलनका हे लग्नाचा २५ वा वाढदिवस साजरा करण्यासाठी पत्नी व मुलासह दुबईला गेले होते. मात्र, युद्ध सुरू झाल्याने त्यांच्या लग्न वाढदिवसावर विरजण पडले. ते सध्या दुबईमधील मनकुल येथील एका मित्राकडे सुरक्षित असल्याची माहिती त्यांनी भ्रमणध्वनीवर दिली.
यासोबतच शर्मा कुटुंबीय दुबईत असल्याची माहिती आहे. मात्र, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. शिवाय जिल्ह्यातील काही विद्यार्थीही अडकले असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले. याबाबत जिल्हा प्रशासनाशी संबंधितांची माहिती घेऊन संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत असल्याची माहिती निवासी जिल्हाधिकारी भय्यासाहेब बेहेरे यांनी दिली.
प्रशासनाने केली ‘हेल्पलाइन’ची सोय
सुनील केलनका, त्यांची पत्नी व मुलगा दुबईतील मनकुल येथील मित्राकडे सुखरूप आहेत.केलनका कुटुंबीयाने मदतीची मागणी केली आहे. यासह काही विद्यार्थीही दुबईत अडकल्याची माहिती आहे. भविष्यातील संभाव्य धोके टाळण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहे. नागरिकांनी अफवांकडे दुर्लक्ष करावे आणि आपल्या आप्तांची माहिती प्रशासनाला द्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
महाराष्ट्र शासन आणि केंद्र सरकार परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे. आपल्या जिल्ह्यातील ज्या नागरिकांचे कुटुंबीय या देशात आहेत, त्यांनी घाबरून न जाता तातडीने माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्कालीन कक्षाला कळवावी. केंद्र शासन नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्याचे बेहरे यांनी स्पष्ट केले आहे.
इराण आणि आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे तेथे राहणाऱ्या व फिरायला गेलेल्या लोकांच्या जीवनावरच परिणाम झाला नाही तर भारतीय कुटुंबांमध्ये, विशेषतः जिल्ह्यातील लोकांमध्ये त्यांच्या नातेवाईकांना त्यांच्या सुरक्षितेबद्दल चिंता वाटत आहे. त्यामुळे तेथे असणाऱ्या लोकांची तत्परतेने माहिती घेऊन त्यांच्याशी संपर्क साधला जात आहे. त्यांना परत आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
-भय्यासाहेब बेहेरे, निवासी उपजिल्हाधिकारी, गोंदिया
