गोंदिया : रामटेक-तुमसर राष्ट्रीय महामार्गावरील खापा शेतशिवारातील हसारा टर्निंग परिसर रविवारी दुपारी एका भीषण अपघाताने हादरून गेला. महिंद्रा बोलेरो आणि धानाने भरलेल्या ट्रकची समोरासमोर झालेली प्रचंड धडक झाली. या दुर्घटनेत बोलेरोमधील दोन प्रवाशांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर सहा जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. जखमींमध्ये महिलांचाही समावेश असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांच्यावर वैद्यकीय पथकाकडून कसून उपचार सुरू आहेत. हेमलाल राधेलाल वरकुडे (५६) रा. छिंदवाडा आणि भूताबाई भादुलाल सरयाम (६७) रा. छिंदवाडा असे या घटनेतील मृतकांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी सुमारे २.३० वाजण्याच्या सुमारास मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्याकडून येणारी महिंद्रा बोलेरो (क्र. एमपी ०४ बीसी ०६१२) रामटेककडून तुमसरच्या दिशेने येत होती. त्याचवेळी तुमसरकडून रामटेकच्या दिशेने धान भरून जाणारा ट्रक (क्र. एमएच ३१ एपी ५६१७) समोरून येत होता. खापा शेतशिवारातील हसारा टर्निंगजवळ दोन्ही वाहनांमध्ये समोरासमोर जोरदार धडक झाली. अपघाताचा आवाज परिसरात घुमला आणि काही क्षणांतच घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली.

ग्रामस्थांकडून मदतीचा हात

धडकेची तीव्रता इतकी होती की बोलेरो वाहनाची दिशा बदलून ते रस्त्याच्या कडेला फेकले गेले. दोन्ही वाहनांच्या दर्शनी भागाचा चुराडा झाला असून लोखंडी सांगाड्यात रूपांतर झालेल्या बोलेरोमध्ये काही प्रवासी अडकून पडले होते. अपघाताचे दृश्य पाहून उपस्थित नागरिकही सुन्न झाले.

घटनेची माहिती मिळताच तुमसर पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, खापा आणि परिसरातील ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखत मदतीचा हात पुढे केला. वाहनांमध्ये अडकलेल्या जखमींना बाहेर काढण्यासाठी नागरिकांनी अथक प्रयत्न केले. त्यानंतर  सुखदेव धुर्वे, उर्मिला धुर्वे,  मणीलाल इरको, जितेंद्र धुर्वे ,सुरेश धुर्वे, प्रमिला उके, खुशी धुर्वे या सात ही जखमींना तातडीने रुग्णवाहिकेद्वारे उपजिल्हा रुग्णालय, तुमसर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी उच्चस्तरीय वैद्यकीय केंद्रात हलविण्याची तयारी सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

सुरक्षेच्या उपाययोजनांची मागणी

प्राथमिक माहितीनुसार, मृत व्यक्ती आणि काही जखमी हे मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यातील रहिवासी आहेत. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू असून त्यांच्या नातेवाईकांना माहिती देण्यात येत आहे. दरम्यान, हसारा टर्निंग हा परिसर पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. या वळणावर यापूर्वीही अनेक लहान-मोठे अपघात घडले असून अनेकांनी आपले प्राण गमावले आहेत. अरुंद वळण, भरधाव वाहने आणि अपुऱ्या सुरक्षात्मक उपाययोजना यामुळे हा मार्ग दिवसेंदिवस ‘मृत्यूमार्ग’ म्हणून ओळखला जाऊ लागला आहे.

प्रत्येक अपघातानंतर सुरक्षेच्या उपाययोजनांची मागणी होते; मात्र प्रत्यक्षात ठोस पावले उचलली जात नसल्याची खंत स्थानिक नागरिक व्यक्त करीत आहेत. या पार्श्वभूमीवर हसारा टर्निंग येथे वेगमर्यादा दर्शविणारे फलक, रिफ्लेक्टर, चेतावणी दिवे, संरक्षक कठडे आणि रस्त्याचे रुंदीकरण यांसारख्या उपाययोजना तातडीने राबवाव्यात, अशी मागणी नागरिकांनी पुन्हा एकदा केली आहे. अन्यथा निष्पाप जीवांचा बळी घेणारी ही दुर्घटनांची मालिका थांबणार नसल्याची भीती व्यक्त होत आहे. या भीषण अपघाताचा पुढील तपास तुमसर पोलीस ठाण्याचे ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांकडून सर्व बाजूंनी चौकशी करण्यात येत आहे. रविवारी दुपारच्या या दुर्घटनेने संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली असून महामार्ग सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.