नागपूर : दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील प्रमुख रेल्वे स्थानक गोंदिया येथून होळीनिमित्ताने दोन विशेष गाड्या सोडण्यात येत आहे. त्यामुळे विदर्भातून उत्तर भारताकडे जाणाऱ्यांना सुविधा होणार आहे. होळी सणाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने गोंदिया ते छपरा जंक्शनदरम्यान दोन विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

उत्तर भारतात जाणाऱ्या तसेच तेथून परतणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने, सणाच्या काळात प्रवाशांना सुलभ, सुरक्षित आणि वेळेवर प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी या विशेष गाड्या प्रत्येकी एक फेरीसाठी धावणार आहेत.

 या विशेष रेल्वेगाड्या गोंदिया – छपरा –गोंदिया मार्गावर चालवण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. या गाड्यांमुळे मध्य भारत आणि उत्तर भारतातील अनेक महत्त्वाच्या स्थानकांना थेट जोडणी मिळणार असून प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

गोंदिया–छपरा (होळी विशेष) ही विशेष गाडी १ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता गोंदियाहून रवाना होईल. डोंगरगड, राजनांदगाव, दुर्ग, रायपूर, उसलापूर, पेंड्रारोड, अनूपपूर, शहडोल, कटनी, सतना, प्रयागराज छिवकी, चुनार, वाराणसी, जौनपूर, गाझीपूर, बलिया, रेवती आदी प्रमुख स्थानकांवर थांबे घेत ही गाडी ३ मार्च २०२६ रोजी रात्री १२.४५ वाजता छपरा जंक्शन येथे पोहोचेल.

गाडी क्रमांक ०८८६४ (छपरा–गोंदिया होळी विशेष) परतीच्या प्रवासासाठी ही गाडी ३ मार्च २०२६ रोजी पहाटे ४.४५ वाजता छपराहून सुटेल. बकुलहा, रेवती, बलिया, गाझीपूर, वाराणसी, प्रयागराज छिवकी, सतना, कटनी, अनूपपूर, उसलापूर, रायपूर, दुर्ग, राजनांदगाव आदी स्थानकांवर थांबत ही गाडी ४ मार्च २०२६ रोजी सकाळी ११ वाजता गोंदिया येथे पोहोचेल. होळी सणाच्या निमित्ताने आपल्या गावी जाणाऱ्या तसेच नातेवाईकांकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने, या विशेष गाड्यांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. या निर्णयामुळे सणासुदीच्या काळात होणारी प्रवाशांची गैरसोय टळण्यास मदत होणार आहे.