गोंदिया : वैवाहिक नात्यातील अविश्वास, संशय आणि अनैतिक संबंधांच्या गुंतागुंतीतून अखेर एका व्यक्तीचा जीव गेला. गोंदिया शहरालगतच्या कुडवा परिसरात घडलेल्या या थरारक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची गळा दाबून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार रामनगर पोलिसांच्या तपासात उघड झाला असून, आरोपी पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक करण्यात आली आहे.

राजेंद्र कटरे असे मृत व्यक्तीचे नाव असून, आरोपींमध्ये पत्नी अनिता कटरे आणि तिचा प्रियकर संजय लिल्हारे यांचा समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र हा दुसरी पत्नी अनितासोबत कुडवा येथे वास्तव्यास होता. गेल्या दीड वर्षांपासून अनिताचे संजय लिल्हारे याच्याशी अनैतिक संबंध असल्याची माहिती समोर आली आहे. याच कारणावरून पती-पत्नीमध्ये सातत्याने वाद होत होते.

संशय, वाद आणि अखेर काळरात्र

बुधवारी रात्री घराच्या कागदपत्रांवरून तसेच पत्नीच्या वर्तनावरून राजेंद्र आणि अनिता यांच्यात जोरदार वाद झाला. संताप आणि सूडाच्या भावनेतून अनिताने मध्यरात्रीनंतर प्रियकर संजयला घरी बोलावले. रात्री तीनच्या सुमारास राजेंद्र झोपेत असतानाच दोघांनी मिळून त्याचा गळा आवळला आणि उशीने तोंड दाबून त्याची हत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले.

बहिणीच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला कट

राजेंद्रच्या मृत्यूची माहिती मिळताच त्याची बहीण नर्मदा कुडवा येथे पोहोचली. भावाच्या गळ्यावर जखमा आणि गळा दाबल्याच्या खुणा पाहून तिला संशय आला. त्यांनी तत्काळ रामनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी संशयाच्या आधारे अनिता आणि संजय यांना ताब्यात घेत चौकशी केली असता, दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली.

न्यायालयाकडून पोलीस कोठडी

रामनगर पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंद करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आरोपींना ३१ मे रविवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रवीण बोरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.