गोंदिया : संकटाची चाहूल लागली की प्रशासनाची खरी कसोटी सुरू होते. सालेकसा तालुक्यात रविवारपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने अनेक गावांचा संपर्क तुटला, रस्ते पाण्याखाली गेले आणि जनजीवन विस्कळीत झाले. अशा बिकट परिस्थितीत सोमवारी (६ जुलै) भजेपार येथील एका गर्भवती महिलेच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला. यावेळी आरोग्य विभागाने दाखविलेली तत्परता आणि निर्णयक्षमता एका जीवाला नव्हे, तर मातृत्वालाच सुरक्षित किनारा मिळवून देणारी ठरली.
पूराच्या वेढ्यात वेळेशी झुंज
प्राथमिक आरोग्य केंद्र सातगाव अंतर्गत येणाऱ्या आयुष्यमान आरोग्य मंदिर भजेपारच्या कार्यक्षेत्रातील संबंधित महिलेची प्रकृती गंभीर होत असल्याची माहिती मिळताच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत गोल्हार यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले. पाण्याने वेढलेल्या परिसरात पोहोचणे हेच मोठे आव्हान असताना आरोग्य विभागाने कोणतीही दिरंगाई न करता कृतीला प्राधान्य दिले.
कर्तव्यापुढे संकटही ठरले दुय्यम
समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. दिनेश कटरे, आरोग्य सेविका कु. विद्या बहेकार आणि आशा स्वयंसेविका श्रीमती विनूताई खांडवाये यांनी स्वतःच्या सुरक्षिततेची पर्वा न करता पूरग्रस्त भागात प्रवेश केला. प्रतिकूल हवामान, तुटलेले मार्ग आणि वाढत्या पाण्याचा वेग या सर्व अडथळ्यांवर मात करत त्यांनी गर्भवती महिलेला सुरक्षितपणे बाहेर काढले आणि पुढील उपचारासाठी स्थलांतरित केले. संकटसमयी घेतलेला त्यांचा अचूक निर्णय जीव वाचविणारा ठरला. “पूरामुळे संपर्क व्यवस्था खंडित झाली होती. मात्र महिला आणि बाळाचे प्राण सुरक्षित ठेवणे हेच आमचे सर्वोच्च कर्तव्य होते,” असे डॉ. दिनेश कटरे यांनी सांगितले.
संकल्पनेतून कृतीकडे…
‘सर्वांसाठी आरोग्य सेवा’ आणि ‘माझं गाव आरोग्यसंपन्न गाव’ या संकल्पना केवळ घोषणांपुरत्या मर्यादित नसून त्या प्रत्यक्ष कृतीत उतरविण्याची क्षमता जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेकडे असल्याचे या घटनेने सिद्ध केले. दुर्गम भागातही सेवा पोहोचविण्याचा प्रशासनाचा निर्धार या कार्यातून दिसून आला.
प्रतिकूल परिस्थितीत धैर्य, समन्वय आणि सेवाभाव यांची सांगड घालणाऱ्या आरोग्य पथकाच्या कार्याबद्दल महिलेच्या कुटुंबीयांनी कृतज्ञता व्यक्त केली.
