गोंदिया : प्रेमसंबंध असलेल्या तरुणीची अचानक प्रकृती खालावल्यानंतर तिला वैद्यकीय मदत मिळवून देण्याऐवजी घटनास्थळी एकटे सोडून तरुणाने पलायन केल्याचा प्रकार सावकारटोली बसस्थानक परिसरात रविवार ३० ऑगस्ट रोजी घडला. या घटनेत धामणगाव येथील २१ वर्षीय नंदिनी प्रेमसिंग चौहान हिचा मृत्यू झाला.
याप्रकरणी गोंदिया ग्रामीण पोलिसांनी जागेश्वर ऊर्फ सोनू हेमराज पटले (२९), रा. धामणगाव, याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नंदिनी आणि जागेश्वर यांच्यात प्रेमसंबंध होते. घटनेच्या दिवशी दोघेही सावकारटोली परिसरात एकत्र होते. याचदरम्यान नंदिनीची प्रकृती अचानक अत्यंत खालावली. तिला भोवळ येत होती. तसेच तिला वाहनात बसणे आणि व्यवस्थित बोलणेही शक्य होत नसल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. प्रकृती अत्यंत गंभीर होत असतानाही तिला तातडीने रुग्णालयात नेण्याऐवजी आरोपीने तिला तेथेच सोडल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे, नंदिनीने विश्वासाने आपला मोबाइल फोन आरोपीकडे ठेवला होता. तिचा मोबाइल स्वतःकडे असतानाही आरोपीने तिच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली नाही, तसेच घटनास्थळावरून निघून गेल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
दरम्यान, नंदिनीची प्रकृती बिघडल्याची माहिती मिळाल्यानंतर पुढील वैद्यकीय प्रक्रिया करण्यात आली. मात्र, दरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर तिच्या कुटुंबीयांकडून प्रश्न उपस्थित करण्यात आले असून, संकटाच्या प्रसंगी मदतीचा हात देण्याऐवजी तिला एकटे का सोडण्यात आले, याचा तपास महत्त्वाचा ठरणार आहे.
सहायक पोलीस निरीक्षक वर्षा नेताम यांच्या तक्रारीवरून गोंदिया ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक वैभव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक वीरेंद्र भोसले तपास करीत असून, घटनेमागील नेमकी परिस्थिती आणि आरोपीची भूमिका तपासली जात आहे. आरोपांची सत्यता तपासाअंती स्पष्ट होणार आहे.
