गोंदिया : गोरेगाव तालुक्यातील भडंगा गावातील अवैध दारूविक्रीला आळा घालून दारूमुक्त समाजनिर्मितीचा निर्धार करत गोरेगाव तालुक्यातील भडंगा येथे गुरुवार २७ ऑगस्ट रोजी हजारो ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरून भव्य महारॅली काढली. ग्रामपंचायत कार्यालयापासून सकाळी ११ वाजता सुरू झालेल्या या महारॅलीत महिला, युवक, विद्यार्थी, शिक्षक, ज्येष्ठ नागरिक तसेच ग्रामपंचायत, दारूबंदी आणि तंटामुक्ती समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. दारूबंदीच्या घोषणांनी गावचे वातावरण भारावून गेले.
महारॅलीत हातात जनजागृतीपर फलक घेऊन ग्रामस्थांनी ‘दारूमुक्त गाव, सुरक्षित कुटुंब’ आणि ‘नशामुक्त युवा, सशक्त समाज’ अशा घोषणांतून आपली भूमिका स्पष्ट केली. दारूच्या व्यसनामुळे कुटुंबांवर येणारे आर्थिक संकट, वाढणारे कौटुंबिक कलह आणि सामाजिक तणाव याकडे ग्रामस्थांनी लक्ष वेधले. भावी पिढीला व्यसनाच्या विळख्यापासून दूर ठेवणे ही केवळ एखाद्या कुटुंबाची नव्हे, तर संपूर्ण समाजाची जबाबदारी असल्याचा सूर यावेळी उमटला.
महिलांचा पुढाकार, युवकांचा निर्धार
महारॅलीतील महिलांची लक्षणीय उपस्थिती विशेष ठरली. दारूच्या दुष्परिणामांचा थेट फटका कुटुंबाला बसत असल्याने महिलांनी दारूबंदीच्या मागणीला ठाम पाठिंबा दिला. युवकांनीही उत्साहाने सहभाग घेत नशामुक्त समाज उभारण्याचा संकल्प केला. जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक विद्यालय, भडंगा येथील विद्यार्थी व शिक्षकवर्गाची उपस्थितीही लक्षवेधी ठरली.
अवैध दारूविक्रीविरोधातील लढा कायदा हातात न घेता लोकशाही मार्गाने पुढे नेण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला. महारॅलीच्या आदल्या दिवशी संबंधित पदाधिकाऱ्यांना सामूहिक निवेदन देण्यात आले होते. तसेच गोरेगाव पोलिस ठाण्यात निवेदन साद करून अवैध दारूविक्रीवर नियंत्रण ठेवण्याची मागणी करण्यात आली. दारूबंदी समितीचे अध्यक्ष नरेंद्र खोब्रागडे, सरपंच अतुल मोटघरे, उपसरपंच बाबूलाल मस्करे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष रविंद्र रहांगडाले, उज्ज्वल राऊत यांच्यासह अनेक पदाधिकारी, महिला व ग्रामस्थ सहभागी झाले.
आता प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष
भडंग्यातील या सामूहिक हुंकाराने दारूबंदीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. ग्रामस्थांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचला असला, तरी हा संकल्प प्रत्यक्षात उतरविण्याचे आव्हान आता प्रशासनासमोर आहे. अवैध दारूविक्रीविरोधात किती प्रभावी कारवाई होते आणि जनजागृतीला प्रशासनाची किती साथ मिळते, यावर भडंग्याच्या दारूमुक्तीच्या संकल्पाची पुढील दिशा निश्चित होणार आहे.
